Entertainment News Live Updates 6 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 06 Oct 2022 07:05 PM
Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात घुमणार ‘पुष्पा’चा आवाज; खास पाहुणा येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

लवकरच ‘बिग बॉस मराठी सीझन 4’च्या घरात ‘पुष्पा’चा दमदार आवाज घुमणार आहे. अर्थात अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) ‘बिग बॉस मराठी सीझन 4’च्या घरात दमदार एन्ट्री घेणार आहे. नुकताच या शोचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे ‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात एन्ट्री करताना दिसत आहे. तर, श्रेयस एन्ट्री करतानाच खास पुष्पाच्या आवाजात ‘मै झुकेगा नही साला’ हा प्रसिद्ध डायलॉग म्हणताना दिसत आहे.


 





Shivpratap Garudjhep: संपूर्ण महाराष्ट्रात दुमदुमला 'जय भवानी जय शिवराय’चा घोष! ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

यंदा विजयादशमीचा मुहूर्त मराठी सिनेरसिकांसाठी एक अनोखी भेट घेऊन आला. मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ (Shivpratap Garudjhep) चित्रपट प्रदर्शित झाल्याचा आनंद चहूदिशांना पहायला मिळत आहे. ‘शिवप्रताप गरुडझेप’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून सर्वजण या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते. 5 ऑक्टोबर, विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा दिमाखदार प्रिमियर सोहळा नुकताच संपन्न झाला.


 





अब्दु रोजिकच्या विरोधात उभे ठाकले ‘बिग बॉस 16’चे स्पर्धक, टास्क दरम्यान पाडलं एकटं!

लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा 16वा (Bigg Boss 16) सीझन सुरू झाला आहे. यंदाचा सीझनदेखील नेहमीप्रमाणे खूपच मनोरंजक आहे. यावेळी स्पर्धकांसोबत बिग बॉसनेही खेळाच्या मैदानात प्रवेश केला आहे. हा रिअॅलिटी शो घरात होणाऱ्या वादांसाठीही प्रसिद्ध आहे. यावेळीही अनेक प्रसिद्ध चेहरे या शोमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र, लहानगा दिसणारा अब्दु रोजिक (Abdu Rozik) या सीझनचा आकर्षण बिंदू ठरला आहे. आपल्या निरागसपणाने तो प्रेक्षकांची मने जिंकत असला, तरी नुकत्याच पार पडलेल्या टास्कमध्ये स्पर्धकांनी त्याच्या विरोधात कट रचत त्याला एकटे पाडले आहे.


 





Palyad Teaser: 'उंच उंच उडू आज, आभाळात फिरू...'; 'पल्याड' चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर लाँच

Palyad Teaser:  फोर्ब्ससारख्या जागतिक किर्तीच्या मासिकानं दखल घेतलेला, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये मानाचे समजले जाणारे सर्वच पुरस्कार आपल्या नावे करणाऱ्या 'पल्याड' (Palyad) या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. मीडियापासून सोशल मीडियापर्यंत सर्वच ठिकाणी या चित्रपटावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला जात असल्यानं रसिकांनाही हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे. हि उत्सुकता आणखी शिगेला पोहोचवणारा 'पल्याड'चा टिझर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा विषय, आशय आणि वातावरणाची झलक दाखवणारा 'पल्याड'चा टिझर सोशल मीडियावर केवळ धुमाकूळ घालत नसून, या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळेल याचा अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो. 4 नोव्हेंबर रोजी 'पल्याड' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 


Kaun Banega Crorepati 14: केबीसीच्या मंचावर खास पाहुण्यांची एन्ट्री; बिग बी झाले भावूक, प्रोमो व्हायरल

Kaun Banega Crorepati 14 Promo: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम  ‘कौन बनेगा करोडती’ चा (Kaun Banega Crorepati) सध्या 14 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिझनचे सूत्रसंचालन अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे करत आहेत. सध्या ‘कौन बनेगा करोडती-14’ च्या एपिसोडमध्ये भारतातील वेगवेगळ्या भागामधील स्पर्धक सहभागी होतात.  या कार्यक्रमाच्या आगमी एपिसोडमध्ये काही खास पाहुण्यांची एन्ट्री होणार आहे. या पाहुण्यांना पाहून बिग बी भावूक झाले. 



Sushmita Sen: सुष्मिता सेन साकारणार गौरी सावंत यांची भूमिका; शेअर केला 'ताली' मधील लूक

Sushmita Sen: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी  आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. त्यामुळे सुष्मिता सेन चर्चेत होती. आता सध्या सुष्मिता देखील प्रकाशझोतात आली आहे.  एका आगामी चित्रपटातील सुष्मिताचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या सुष्मिताच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 



RRR Oscars 2023 Nomination: ‘आरआरआर’ची ऑस्करमध्ये जबरदस्त एन्ट्री; एक-दोन नव्हे, तब्बल 10पेक्षा अधिक विभागांमध्ये नामांकनासाठी पाठवला चित्रपट!

RRR Oscars 2023 Nomination: चाहत्यांना आनंदाचा धक्का देत ‘आरआरआर’ने ऑस्कर नामांकनामध्ये अधिकृत एन्ट्री घेतली आहे. इतकंच नाही, तर ‘आरआरआर’ला एक-दोन नव्हे तर तब्बल 14 विभागांमध्ये नॉमिनेशन मिळालं आहे. एसएस राजमौलींचा ‘आरआरआर’ ऑस्कर यादीत सामील झाल्याचे कळताच चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. सोशल मीडियावरही चित्रपटाची धूम पाहायला मिळत आहे.


 





विनोदाच्या जगतातील आणखी एक तारा निखळला; कॉमेडियन पराग कंसारा यांचे निधन

टीव्ही विश्वातील लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. या धक्क्यातून लोक सावरलेही नाहीत, तर आता ‘लाफ्टर चॅलेंज’मध्ये झळकलेल्या कॉमेडियन पराग कंसारा (Comedian Parag Kansara) यांचेही आकस्मिक निधन झाले आहे. पराग कंसारा यांच्या निधनानंतर संपूर्ण कॉमेडीविश्व पुन्हा एकदा शोकसागरात बुडाले आहे. 


 





Har Har Mahadev: 'ही माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट'; 'हर हर महादेव' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Har Har Mahadev:  महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व बाजीप्रभूंवर चित्रीत करण्यात आलेला 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील दमदार गाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व रसिकप्रेक्षकांची या गाण्यांना उत्तम दाद मिळत असताना या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. दमदार कलाकार आणि जबरदस्त गाणी असलेल्या या चित्रपटाचे टीझर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेच्या अधिकृत पेजवरून शेअर करण्यात आले आहे. टीझर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता अजूनच वाढवली आहे. 


Virat Kohli: किशोर कुमार यांच्या जुन्या बंगल्याचं झालं आलिशान रेस्टॉरंट; विराट कोहलीनं दाखवली जुहूमधील हॉटेलची झलक

Virat Kohli:  प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या खेळानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. वैयक्तिक आयुष्यामुळे देखील तो चर्चेत असतो. क्रिकेटबरोबरच विराट हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात देखील गुंतवणूक करतो. त्याचे काही रेस्टॉरंट देखील आहे. One8 कम्यून या जुहू येथील (Juhu) नव्या रेस्टॉरंटची झलक नुकतीच विराटनं चाहत्यांना दाखवली. हे रेस्टॉरंट प्रसिद्ध गायक किशोर कुमार (Kishore Kumar) यांच्या गौरी कुंज या बंगल्यामध्ये बांधण्यात आलं आहे. या रेस्टॉरंटमध्ये विविध चविष्ठ पदार्थांवर खवय्ये ताव मारु शकतात. 



Udit Narayan : गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आला? मॅनेजरने दिलं स्पष्टीकरण

उदित नारायण यांच्या मॅनेजरने सांगितले की, त्यांची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे आणि उदितजींना काहीही झाले नाही. या अफवांना पूर्णविराम देत ते म्हणाले की, अशा बातम्या कुठून व्हायरल होत आहेत हेच आम्हाला कळत नाहीय. मात्र, ही बातमी व्हायरल झाल्यानंतर त्यांना सतत कॉल येऊ लागले आहेत आणि ट्विटरवर देखील चाहते प्रश्नांचा भडीमार करत आहेत. त्यानंतर त्यांनी स्वतः उदित नारायण यांच्याशी चर्चा केली. या व्हायरल बातम्यांमुळे उदित नारायण देखील अस्वस्थ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


 





यश मिळत असतानाच मनोरंजन विश्वातून घेतला काढता पाय, थेट ढाब्यावर काम करू लागलेले संजय मिश्रा!

इंडस्ट्रीत चांगले यश मिळत असतानाच एके दिवशी अचानक संजय मिश्रा यांनी अभिनयविश्वातून काढता पाय घेतला. या दरम्यान त्यांनी एका ढाब्यावर काम करायला सुरुवात केली. यामागे वडिलांचा मृत्यू हे कारण होते. संजय मिश्रा त्याच्या वडिलांच्या खूप जवळ होते आणि वडिलांच्या जाण्यानंतर ते इतके कोलमडून गेले की, मनोरंजन विश्व देखील त्यांना सावरू शकलं नाही. यानंतर त्यांनी थेट ऋषिकेश गाठत तेथील एका ढाब्यावर काम करण्यास सुरुवात केली.


 





आधी चित्रपटांत येण्यासाठी केला अट्टहास, प्रसिद्ध झाल्यावर संन्यास घेण्याचा निर्णय घेणारे विनोद खन्ना!

मनोरंजन विश्वात 70च्या दशकांत अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांची जादू पसरलेली होती. तर, दुसरीकडे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देखील बॉलिवूड गाजवू लागले होते. याच दरम्यान आणखी एका अभिनेत्याने मनोरंजन विश्वात एन्ट्री घेतली आणि अवघ्या प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वळवून घेतलं. या अभिनेत्याचं नाव होतं विनोद खन्ना (Vinod Khanna). मनोरंजन विश्वात खलनायक म्हणून एंट्री करणाऱ्या विनोद खन्ना यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारात मनोरंजन विश्वावर अधिराज्य गाजवलं.


 





Ram Kadam On Adipurush Movie: 'आदिपुरुष महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही'; राम कदमांचं ट्वीट, चित्रपटात देवदेवतांचं विडंबन झाल्याचा आरोप

Ram Kadam On Adipurush Movie: आदिपुरुष  (Adipurush) या चित्रपटावर आता भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी  टीका केली आहे. 'हा चित्रपट महाराष्ट्रमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही.' असं ट्वीट राम कदम यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. आदिपुरुष या चित्रपटात देवदेवतांचं विडंबन केलं आहे, असा आरोप राम कदम यांनी केला आहे. 





प्रतीक्षा संपली! लाल सिंह चड्ढा ओटीटीवर झाला रिलीज; 'या' प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट

Laal Singh Chaddha On Netflix: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता   आमिर खानचा (Aamir Khan) लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आमिर खानच्या या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी  केली. बॉयकॉट लाल सिंह चड्ढा या हॅशटॅगचा ट्रेंड देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. याचा परिणाम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला. हा चित्रपट ज्यांनी चित्रपटगृहात जाऊन पाहिला नाही, ते आता घरबसल्या पाहू शकणार आहेत. कारण लाल सिंह चड्ढा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.  



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


उर्मिला मातोंडकरचं ओटीटी विश्वात पदार्पण; 50 पेक्षा अधिक सिनेमे नाकारल्यानंतर आता झळकणार Tiwari वेबसीरिजमध्ये


उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar) मनोरंजनसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. बालकलाकार ते सुपरस्टार असा उर्मिलाचा प्रवास आहे. या प्रवासात तिने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. आता उर्मिला ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. लवकरच तिची 'तिवारी' (Tiwari) ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सत्या', 'एक हसीना थी', 'भूत', 'रंगीला' 'कौन', 'पिंजर' अशा अनेक सिनेमांत उर्मिलाने काम केलं आहे. आता 'तिवारी' या वेबसीरिजच्या माध्यमातून उर्मिला ओटीटी विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. कमान सौरभ वर्माने या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


'आटली बाटली फुटली'; 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वातलं पहिलं वहिलं नॉमिनेशन कार्य


'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून सगळीकडे 'बिग बॉस मराठी 4'ची चर्चा सुरू आहे. कालच्या भागात त्रिशूल, मेघा, रोहित आणि प्रसाद हे चार सदस्य निरुपयोगी ठरले होते. पण बिग बॉसने सदस्यांना 'रुम ऑफ फॉर्च्युन' हे खास सरप्राईझ दिले. आजच्या भागात 'आटली बाटली फुटली' हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.


लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान ओडिशाचे लोकप्रिय गायक मुरली प्रसाद महापात्रा यांचे निधन


ओडिशाचे (Odia) लोकप्रिय गायक मुरली प्रसाद महापात्रा (Murali Mohapatra) यांचे निधन झाले आहे. दुर्गापूजेच्या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर गाणं गात असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ओडिशाच्या जेपोर शहरात दुर्गापूजेदरम्यान एका लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुरली प्रसाद महापात्रादेखील गाणं म्हणत होते. कार्यक्रमादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.