Duniyadari : 'दुनियादारी' (Duniyadari) या ब्लॉकबस्टर सिनेमाला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 19 जुलै 2013 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला. आज 10 वर्षांनंतरही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. तरुणाईची पाऊले सिनेमागृहाकडे वळवण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला. 


'दुनियादारी' या सिनेमाने 2013 साली बॉक्स ऑफिसवर 30 कोटींचा गल्ला जमवला. 'दुनियादारी' या सिनेमाने तरुणांना आपलंस करण्यासोबत मोठ्यांनाही आपल्या आठवणीत रमवलं. मैत्रीचं नातं जपणारे जिगरी दोस्त, कॉलेजच्या कट्यावरचा कल्ला, टपरीवरची कटींग,  कॅम्पसमधला झगमगाट आणि कॉलेज संपल्यानंतरही टिकून राहिलेली मैत्री या सर्व गोष्टींमुळे सिनेरसिकांना 'दुनियादारी' भावली. 


'दुनियादारी' सिनेमातील रेट्रो स्टाईल प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. संजय जाधव दिग्दर्शित 'दुनियादारी' हा सिनेमा सुहास शिरवळकर यांच्या 'दुनियादारी' या काजंबरीवर आधारित आहे. 'दुनियादारी' या सिनेमातील ' जिंदगी', 'टिक टिक वाजते', 'यारा यारा', 'देवा तुझ्या गाभाऱ्यला' या गाण्यांना विशेष पसंती मिळाली आहे. 'टिक टिक वाजते' हे गाणं आजही अनेकांचं कॉलर ट्यून आहे.


तगडी स्टारकास्ट असलेला 'दुनियादारी' (Duniyadari Starcast)


'दुनियादारी' हा सिनेमा मैत्री आणि प्रेम या दोन गोष्टींवर आधारित आहे.  स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), सई ताम्हणकर (Sai Tamhankar), उर्मिला कोठारे (Urmila Kothare), अंकुश चौधरी (Ankush Choudhary), जितेंद्र जोशी (Jitendra Joshi), सुशांत शेलार (Sushant Shelar) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. श्रेयस, शिरीन, मीनाक्षी, दिग्या आणि साई या सहा मित्रांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. 


'दुनियादारी' सिनेमातील गाजलेले डायलॉग (Duniyadari Famous Dialogue)


'दुनियादारी' या सिनेमातील संवाद फक्त गाजलेच नाही तर हे संवाद आजही प्रेक्षकांचे तोंडपाठ आहेत. 'मेहुणे मेहुणे मेव्हान्यांचे पाव्हणे', 'तुझी माझी यारी मग खड्ड्यात गेली दुनियादारी', 'सरस्वती माते मला नाही पावलीस या पोरांना तरी पाव गं बाई', 'हातात क्याटबरी असताना समोर आलेलं बिस्कीटसुद्धा तुला सोडवत नाही...बच्चूच आहेस तू', असे सिनेमातील अनेक डायलॉग चांगलेच गाजले आहेत. 


तिकीटबारीवर विक्रमी कलेक्शन करणाऱ्या 'दुनियादारी' या आयकॉनिक सिनेमाने 10 वर्ष पूर्ण केली आहेत. पण आजही हा सिनेमा आवडीने पाहिला जातो. या सिनेमाने मराठी सिनेमांची परिभाषा बदलली असे म्हटले जाते.  लवकरच या ब्लॉकबस्टरर सिनेमाचा दुसरा भाग अर्थात 'पुन्हा दुनियादारी' (Punha Duniyadari) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Chala Hawa Yeu Dya: 'दुनियादारी'ची टीम लावणार 'चला हवा येऊ द्या' मध्ये हजेरी; कलाकार सांगणार चित्रपटाचे किस्से