मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनमध्ये अटक झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाने अटी आणि शर्तींसह बुधवारी (7 ऑक्टोबर) जामीन मंजूर केला. जेलमधून सुटल्यानंतर रिया रात्री दीड वाजता तिच्या घरी पोहोचली. रिया चक्रवर्ती 28 दिवस जेलमध्ये होती. रिया ड्रग्ज माफियाचा भाग नाही, असं सांगत न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. रिया चक्रवर्ती मुंबईतील भायखळ्याच्या महिला जेलमध्ये होती.

Continues below advertisement


यासोबतच प्रसिद्ध व्यक्ती किंवा लोकप्रिय मान्यवरांना कठोर शिक्षा दिली जावी, जेणेकरुन लोकांसमोर एक उदाहरण असेल, असा युक्तिवाद एनसीबीने केला होता. तो देखील न्यायालयाने फेटाळला. कायद्यासमोर सगळेच समान आहे. ती ड्रग्ज डिलर्सचा भाग नव्हती. तिने कथितरित्या आपल्यासाठी खरेदी केलेले अंमली पदार्थ हे पैशांसाठी किंवा इतर फायद्यासाठी इतर कोणालाही दिले नाहीत, असं न्यायालयाने म्हटलं.


बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ती पोलिसांच्या उपस्थितीत भायखळा महिला जेलमधून बाहेर पडली. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने सुशांत सिंह राजपूतचा सहकारी दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांनाही जामीन मंजूर केला. मात्र रियाचा भाऊ आणि या प्रकरणातील आरोपी शौविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाने कथित अंमली पदार्थ तस्कर अब्देल बासित परिहारचाही याचिकाही फेटाळली.





रिया किंवा सुशांतच्या घरातून कोणतेही अंमली पदार्थ जप्त केलेले नाहीत, असंही हायकोर्टाने म्हटलं. "हे एनसीबीचं मत आहे की, अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं, त्यामुळे कोणतीही जप्ती झालेली नाही. अशातच रियाने अंमली पदार्थांसंबंधित कोणताही गुन्हा केला हे सिद्ध करण्यासाठी सध्या कोणीही साक्षीदार किंवा पुरावा नाही."


जामीनाच्या अटींनुसार रियाला 10 दिवस जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागणार आहे. तसंच पुढील सहा महिन्यातील प्रत्येक महिन्यात एनसीबीसमोर हजर राहावं लागणार आहे. उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर केला. तसंच पुराव्यांसोबत छेडछाड न करण्याचीही तंबीही दिली. याशिवाय पासपोर्ट जमा करण्याचे आणि परवानगीशिवाय शहर सोडून न जाण्याचं निर्देशही हायकोर्टाने दिले.


संबंधित बातम्या




Rhea Chakraborty gets bail | काल संध्याकाळी सुटका; मात्र रिया रात्री दीड वाजता घरी