मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करताना अभिनेत्री रिचा चढ्ढाबाबत केलेले वादग्रस्त विधान मागे घेणार का? अशी विचारणा बुधवारी हायकोर्टानं करताच अभिनेत्री पायल घोषच्या वकिलांनी त्यास तयारी दर्शवत पायलच्यावतीनं दिलगिरी व्यक्त केली आहे. अजाणतेपणी जर कुणाची बदनामी झाली असेल तर त्यासाठी बिनशर्त माफी मागत हे प्रकरण संपवण्यास तयार असल्याची माहिती दिली आहे. यावर याचिकाकर्त्यांनीही समाधान व्यक्त केल्यानं सोमवारी सर्व प्रतिवाद्यांना सामंजस्यानं हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.


ऑगस्ट 2013 मध्ये अनुराग कश्यपनं आपल्याला त्याच्या घरी बोलावून लैंगिक गैरवर्तणुक आणि अश्लील वर्तन केल्याचा आरोप पायलने जाहीररीत्या केली. याबाबत रितसर तक्रार दाखल केल्यानंतर त्याविषयी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू असतानाच पायलनं 'रिचा चढ्ढा, हुमा कुरेशी आणि माही गिल या आपल्यासोबत कंफर्टेबल असतात' असं अनुराग कश्यपनं आपल्याला सांगितलं होतं असं वादग्रस्त विधान पायलनं एका मुलाखतीत केलं होता. पायलने केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि तथ्यहीन असून त्यामुळे माझी विनाकारण बदनामी होत असल्याचा दावा करत रिचा चढ्ढानं अॅड. सवीना बेदी आणि ज्येष्ठ वकील अॅड. वीरेंद्र तुळजापूरकर यांच्यामार्फत हायकोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. न्यायमूर्ती अनिल मेनन यांच्यापुढे यावर बुधवारी सुनावणी पार पडली.


हा व्हिडीओ दाखविणाऱ्या एबीएन तेलुगू या युट्युब वाहिनीला तसेच त्यावर प्रतिक्रिया देणा-या अभिनेता कमाल आर. खान यांनाही यात प्रतिवादी करण्यात आले आहे. या सर्व प्रतिवाद्यांना आक्षेपार्ह मजकूर पसरवण्यापासून तसेच तो प्रसारित करण्यापासून तातडीने मनाई करण्यात यावी, अशी विनंतीही रिचाने आपल्या याचिकेतून केली आहे. पायलच्या आरोपामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून प्रचंड अपमान, तिरस्कार, छळ, लोकांकडून होणारी छळवणूक आणि हसे याचा सामनाही करावा लागत आहे. याविधानामुळे आपल्याकडे येणाऱ्या संधींवरही नकारात्मक परिणाम होत आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून आपल्याला प्रचंड ताण आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच, सर्व प्रतिवाद्यांकडून 1 कोटी 10 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी रिचाने याचिकेतून केली आहे.


संबंधित बातम्या :