Subhash Ghai : बॉलिवूड सिनेसृष्टीमधले प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते सुभाष घई (Subhash Ghai) यांच्याविषयी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सुभाष घई यांची प्रकृती बिघडली असून त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुभाष घई यांना बुधवारी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यांना अशक्तपणा जाणवत होता आणि वारंवार चक्कर देखील येत होती. सध्या त्यांच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
रुग्णालयाच्या सूत्रांकडून एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष घई यांच्यावर आयसीयूमध्ये दाखल असलेल्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनय चौहान, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन गोखले आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. तसेच सुभाष घई यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असून त्यांना एका दिवसांत आयसीयूमधून सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात येणार आहे.
राम लखन, सौदागर, परदेस यांसारख्या उत्तम चित्रपटांचे दिग्दर्शक
सुभाष घई यांनी बॉलिवूडला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. कालीचरण, कर्ज, कर्मा, सौदागर, खलनायक या चित्रपटांतून त्यांनी आपला ठसा उमटवला. सुभाष घई यांनी शाहरुख खानचा परदेस हा चित्रपट बनवला होता. याशिवाय 2008 मध्ये त्यांनी ताल आणि सलमान खानचा युवराज या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते.
नुकतच 'या' सिनेमांविषयी केलं होतं भाष्य
2004 मध्ये रिलीज झालेल्या ऐतराजचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले नाही, परंतु त्यांनी त्याची निर्मिती केली होती. नुकताच सुभाष घई यांनी सिनेमाच्या सिक्वेलची घोषणाही केली होती. ज्यामध्ये अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर यांच्याऐवजी ते नवीन चेहरे आणणार असल्याचं सांगितलं होतं. याशिवाय संजय दत्तसोबत सुभाष घई यांच्या ‘खलनायक’ या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच पाहायला मिळणार आहे. वृत्तानुसार, सुभाष घई खलनायक 2 मध्ये काम देखील करत आहेत.