Dhanush: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता धनुषनं (Dhanush) बॉलिवूडमध्ये आणि हॉलिवूडमध्ये देखील विशेष लोकप्रियता मिळवली आहे. धनुष त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. धनुष हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेत असतो. सध्या धनुषचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील धनुषच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. काही लोक धनुषच्या या नव्या लूकचं कौतुक करत आहेत. तर काही जणं त्याला ट्रोल करत आहेत. 


धनुष हाल सोमवारी (29मे) सकाळी एयरपोर्टवर स्पॉट झाला. यावेळी वाढलेले केस, वाढलेली दाढी आणि डोळ्यांवर गॉगल अशा लूकमध्ये धनुष दिसला. एअरपोर्टवरील अनेक धनुषच्या चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी काढला. धनुषचे एअरपोर्टवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटो आणि व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


धनुषच्या एअरपोर्टवरील व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, त्याला नव्या अवतारात लोकांनी कसे ओळखले ? तो पूर्णपणे वेगळा दिसत आहे. तर दुसऱ्या युझरनं या व्हिडीओला कमेंट केली, 'मला वाटतंय तो बाबा रामदेव यांचा बायोपिक बनवणार आहे.' आणखी एका नेटकऱ्यानं धनुषच्या व्हिडीओला कमेंट केली, 'रामदेव बाबांसारखा दिसत आहे.'






धनुषचे चित्रपट 


अभिनेता असण्यासोबतच  धनुष हा निर्माता, दिग्दर्शक आणि पार्श्वगायक देखील आहे. धनुष हा काही दिवसांपूर्वी 'वाथी' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्याच्या अतरंगी रे या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात धनुषसोबतच सारा अली खान आणि अक्षय कुमार यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.  द ग्रे-मॅन या हॉलिवूड चित्रपटात देखील धनुषनं काम केलं. धनुष हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर 5.8 मिलियन फॉलोवर्स आहेत. 


धनुष हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  धनुष आणि ऐश्वर्या  यांनी  2004 मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांनी 18 वर्षांच्या संसारानंतर एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. ऐश्वर्या ही अभिनेते रजनीकांत यांची मुलगी आहे. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Dhanush And Aishwaryaa Divorce : धनुष आणि ऐश्वर्याचे पॅचअप? अभिनेत्याचे वडील म्हणतात..