मुंबई : आधी अभिनेता कमल हसनची मुलगी असलेली आता आमीर खानची मुलगी आहे. वाचून थोडं आश्चर्य वगैरे वाटलं असेल ना... थांबा. आम्ही तुम्हाला थोडं सविस्तर सांगणार आहोत.


तुम्ही थोडे गोंधळेलं असालच, तर फार गोंधळून वगैरे जाऊ नका. तर त्याचं असं आहे की, अमरिश पुरी आणि कमल हसन यांच्या अभिनयाने लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या 'चाची 420' सिनेमामध्ये कमल हसनच्या मुलीचं काम करणारी मुलगी आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या आगामी 'दंगल' सिनेमात आमीरच्या मुलीचं काम करणारी मुलगी ही एकच आहे. आणि या मुलीचं नाव आहे फतिमा सना शेख.

फतिमा सना शेख हिने बालकलाकार म्हणून याआधीही काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. चाची 420 सिनेमाप्रमाणेच अभिनेता शाहरुख खान याच्या 'वन टू का फोर' सिनेमातही तिने काम केलं आहे.

झी वाहिनीवरील 'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' या मालिकेतही फतिमाने महत्त्वाची भूमिका साकारली होती. शिवाय, तीन-चार वर्षांपूर्वी 'आकाश-वाणी' या सिनेमातही फतिमा दिसली होती. आता आमीर खानच्या आगामी 'दंगल' सिनेमात गीता फोगटच्या भूमिकेत फतिमा दिसणार आहे.

गीता फोगट म्हणजे पैलवान महावीर फोगट यांची मुलगी. 2010 साली झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत गीताने 55 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं होतं. कॉमनवेल्थ स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक जिंकणारी गीता फोगट ही पहिली भारतीय आहे.