हैदराबाद:  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा रद्द केल्याचा निर्णय घोषित केल्यानंतर, अनेकांचे धाबे दणाणले. मोदींच्या या निर्णयाने अनेक राजकीय नेते सेलिब्रेटी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आयकर विभागाने यावर धाडसत्र सुरु केल्याने या चिंतेत भरच पडली आहे.


आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षीचा सुपरहिट सिनेमा ठरलेल्या 'बाहुबली'च्या निर्मात्यांच्या कार्यालयांची झडती घेतली. ही झडती हैदराबादमधील बंजारा हिल्स आणि जुबली हिल्स या परिसरातील कार्यालयांवर घेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.तसेच आयकर विभागाच्या नियमित प्रक्रियेनुसार ही झडती घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, अनुष्का शेट्टी आणि राणा दग्गुबती यांची मुख्य भूमिका असलेला 'बाहुबली' या सिनेमाने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमाने जबरदस्त कमाई करत बॉक्स ऑफिसवरचे सर्व विक्रम मोडीत काढले होते.

जगभरातील जवळपास 4000 स्क्रिनवर तेलगू, तामिळ आणि मल्ल्याळम् भाषेसोबतच हिंदीमध्येही हा सिनेमा रिलीज करण्यात आला होता. या सिनेमाने 500 कोटींची कमाई केल्याचे त्यावेळी सांगण्यात येत होते.

त्यामुळे सिनेमा निर्मिता शोबू यारलगाडा आणि प्रसाद देवीनेनी यांनी दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्यासोबत या सिनेमाचा सिक्वेल बनवण्यास सुरुवात केली होती. हा सिनेमा जवळपास पुर्ण झाल्याने आता लवकरच तो सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याने त्यासाठी सिनेमा निर्मात्यांनी वितरकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आयकर विभागाने निर्मात्यांच्या कार्यालयावर धाड टाकल्याचे बोलले जात आहे.