Damodar Natyagruha : मुंबईतील 100 वर्षे जुन्या दामोदर नाट्यगृहाचा (Dampdar Natyagruha) पुनर्विकास होत आहे. दामोदर नाट्यगृहाच्या पाडकामाला आता सुरुवात झाली आहे. दामोदर नाट्यगृह आणि त्याच परिसरात असलेल्या सोशल सर्विस लीग शाळेचा पुनर्विकास केला जात आहे. या सगळ्या कामाची पाहणी आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगनणी यांनी केली. ऐतिहासिक नाट्यगृहाच्या जागी खासगी शाळेची वास्तू उभारण्याचा प्रस्ताव आहे. पण याविरोधात नाट्यकर्मींमध्ये मात्र नाराजी आहे. दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी प्रशांत दामले (Prashant Damle) यांनीही उपोषणाचा इशारा दिला आहे. नाट्यगृहाच्या जागेवर शाळा पुढील दोन वर्षात पूर्ण झाल्यानंतर शाळेच्या जागेवर दामोदर नाट्यगृह उभे केले जाणार, असं दामोदर नाट्यगृह ट्रस्टचे सचिव प्रकाश कोंडूरकर म्हणाले आहेत. 


एबीपी माझाशी बोलताना दामोदर नाट्यगृह ट्रस्टचे सचिव प्रकाश कोंडूरकर (Prakash Kondurkar) म्हणाले की,"दामोदर नाट्यगृहाच्या इमारतीचं पाडकाम करुन तिथे शाळेची इमारत उभी केली जाणार आहे. तर शाळेची इमारत उभी आहे तिथे दामोदर नाट्यगृहाची इमारत उभी राहील. आमच्या शाळेत जवळपास 3000 विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेची इमारत पाडून तिथेच शाळेची इमारत बांधायची हे शक्य होणार नाही कारण विद्यार्थी शिकणार कुठे? त्यामुळे दामोदर नाट्यगृहाची इमारत पाडून तिथे शाळेची इमारत केली जाणार. तिथे विद्यार्थी शिक्षण घेतील". 


आंदोलन करणाऱ्यांनी आमच्याशी चर्चा करावी आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत : प्रकाश कोंडूरकर


प्रकाश कोंडूरकर पुढे म्हणाले,"दोन वर्षात शाळेची इमारत बांधून पूर्ण होईल. विद्यार्थी तिथे शिकायला गेल्यानंतर शाळेची जुनी इमारत पाडून तिथे दामोदर नाट्यगृह इमारत बांधली जाईल. दामोदर नाट्यगृह भव्य असेल. आठ मजली इमारत इथे केली जाईल. डिसेंबरमध्ये कुठल्याही प्रकारची स्थगिती पाडकामाला आम्हाला देण्यात आली नव्हती. डिसेंबर महिन्यात स्थगिती देण्यात आली होती ती प्रदूषणामुळे. आंदोलन करणाऱ्यांनी आमच्याशी चर्चा करावी. आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत. हे सगळे आमचेच आहेत. आम्ही त्यांना परकं समजत नाही. जेवढे अडथळे निर्माण केले जातील तेवढा उशीर दोन्ही इमारती बांधण्यासाठी लागेल. त्यासाठी सगळ्या परवानगी मुंबई महापालिकेने दिल्या आहेत. जे कर्मचारी तिथे काम करत होते ते कर्मचारी आम्ही इथे कामावर रुजू केले आहेत. बाकीचे कर्मचारी हे आमच्या संस्थेशी निगडित नव्हते". 


संबंधित बातम्या


Damodar Natyagruha Exclusive : मुंबईतल्या दामोदर नाट्यगृहावर हातोडा, नाट्यगृह वाचवण्यासाठी प्रशांत दामलेंचा उपोषणाचा इशारा