Bollywood Actress Shefali Shah :  सिनेइंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले आहे. त्यातील काहींच्या वाटेला यश, प्रसिद्धी आले. तर अनेकजण काहीसे दुर्लक्षित राहिले. काही कलाकारांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपला मोर्चा वळवला. ओटीटी प्लॅटफॉर्मने या कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी दिली.  टीव्ही मालिका ते चित्रपटांमध्ये काम करूनही दुर्लक्षित झालेल्या अभिनेत्रीचे नशीब ओटीटी प्लॅटफॉर्मने बदलले. 


या अभिनेत्रीचा सध्या ओटीटीवर दबदबा असल्याचे चित्र आहे. ही अभिनेत्री म्हणजे शेफाली शाह (Shefali Shah). शेफालीचा जन्म 22 मे रोजी 1973 मुंबईमध्ये झाला. शेफालीचे वडील सुधाकर शेट्टी हे आरबीआयमध्ये एक बँकर होते. तर, आई  होमिओपॅथी डॉक्टर आहे. 


शेफालीचे सुरुवातीचे शिक्षण आर्य विद्या मंदिरातून झाले. त्यानंतर मिठीबाई महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदवी घेतली. मात्र, शेफालीचा सुरुवातीपासूनच कलेकडे अधिक कल होता. तिला गाण्याची आणि चित्रकलेची खूप आवड होती. शेफालीने भरतनाट्यमचे प्रशिक्षणही घेतले होते. याशिवाय तिने रंगभूमीवर काम केले. 


रंगभूमी, टीव्ही मालिकेत काम


रंगभूमीवर काम करत असताना शेफालीने 1993 मध्ये टीव्ही जगतात प्रवेश केला. 'नया नुक्कड' नावाचा शो केला. यानंतर  ‘बनेगी अपनी बात’, ‘आरोहण’, ‘हसरतें’, ‘पतजाद’, ‘कभी कभी’, ‘सी हॉक्स’, ‘रहेन’ आणि ‘रामायण’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये शेफालीने काम केले. मात्र, अनेक टीव्ही सीरियल करूनही शेफालीला फारशी ओळख मिळाली नाही.


'रंगीला'तून पदार्पण, 'सत्या'मध्ये सोडली छाप


टीव्ही मालिकांमध्ये काम करत असतानाच तिने चित्रपटांमध्येही काम करायला सुरुवात केली. तिने 1995 मध्ये आमिर खान आणि उर्मिला मातोंडकरची प्रमुख भूमिका असलेल्या'रंगीला'चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात शेफालीने माला मल्होत्राची छोटीशी भूमिका साकारली होती. यानंतर शेफालीने 1998 मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या 'सत्या'मध्ये मनोज वाजपेयींच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेसाठी शेफालीचे खूप कौतुक झाले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा स्क्रीन अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले.






हिंदी चित्रपटांमध्ये केले काम 


यानंतर शेफालीने 'मोहब्बतें', 'मान्सून वेडिंग', 'द लास्ट इयर', 'ब्लॅक अँड व्हाइट', 'लक्ष्मी', 'दिल धडकने दो', 'ब्रदर्स', 'कमांडो 1' यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करूनही शेफालीला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. 


ओटीटीवर सोडली छाप


टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केल्यानंतर शेफालीने ओटीटीकडे आपला मोर्चा वळवला. ओटीटी प्लॅटफॉर्म तिच्यासाठी चांगलेच फायदेशीर ठरले. ओटीटीवरील वेब सीरिजने तिचे नशीब बदलले. 


2019 मध्ये नेटफ्लिक्सवर आलेली वेब सीरिज 'दिल्ली क्राइम'  मध्ये शेफालीची महत्त्वाची भूमिका होती. या वेब सीरिजमध्ये तिने डीसीपी वर्तिका चतुर्वेदीची व्यक्तीरेखा साकारली.  या भूमिकेसाठी शेफालीचे खूप कौतुक झाले.यानंतर शेफालीने 'दिल्ली क्राइम'च्या दुसऱ्या सीझनमध्येही काम केले आणि हा सीझनही हिट ठरला.


त्याशिवाय शेफालीने 'ह्युमन' (Human) या वेब सीरिजमध्येही काम केले. यामध्ये तिने साकारलेल्या ग्रे शेडच्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले. शेफालीने  या वेब सीरिजवर आपली छाप सोडली. वन्स अगेन, Three of Us सारख्या चित्रपटात तिने काम केले.