Damodar Natyagruha : नाटकासह तमाशा, लावणी आणि लोककलेची अभिजात परंपरा जपणारी रंगकर्मींची हक्काची जागा म्हणजे परळचं दामोदर नाट्यगृह (Damodar Natyagruha). 101 वर्षांची परंपरा असणारं दामोदर नाट्यगृह गेल्या काही दिवसांपासून पुनर्बांधणीमुळे चर्चेत आहे. पण आता या नाट्यगृहावर हातोडा पडला आहे. मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणींकडून पाडकामाची पाहणी करण्यात आली. दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.


दामोदर नाट्यगृहाच्या पाड कामाला सुरुवात


दामोदर नाट्यगृहाच्या पाड कामाला सुरुवात झाली आहे. जिथे दामोदर नाट्यगृह होतं तिथेच पुनर्विकास व्हावा. दुसऱ्या जागेत दामोदर नाट्यगृहाच्या पुनर्विकासाला कलाकार मंडळींचा विरोध आहे. मुंबईतील  100 वर्षे जुन्या दामोदर नाट्यगृहाचा  पुनर्विकास होत असून दामोदर नाट्यगृहाच्या पाड कामाला  सुरुवात झाली आहे. दामोदर नाट्यगृह आणि  त्याच परिसरात असलेल्या सोशल सर्विस लीग शाळेचा पुनर्विकास  केला जात आहे. या सगळ्या कामाची पाहणी आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगनणी यांनी  केली. मात्र त्या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या सहकारी मनोरंजन मंडळ आणि त्यासोबतच  नाट्य क्षेत्रातील  कलाकार मंडळींनी  दामोदर नाट्यगृहाचा पुनर्विकास होत असताना तो त्याच ठिकाणी व्हावा आणि भव्य दिव्य असं दामोदर नाट्यगृह लवकरात लवकर उभे केले जावे, अशी मागणी केली आहे.


काय आहेत मागण्या?


1) दामोदर नाट्यगृहाच्या जागी बांधण्यात येणाऱ्या शाळेचं आरक्षण रद्द व्हावं.
2) नाट्यगृहाचा वाढीव FSI नाट्यगृहासाठीच वापरला जावा.
3) नाट्यगृह आणि शाळेचं बांधकाम एकाचवेळी सुरू व्हावं.
4) दामोदर नाट्यगृहाच्या काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना आणि सहकारी मनोरंजन मंडळाच्या डोअर किपर्सना पूर्वीप्रमाणेच नव्या नाट्यगृहात काम मिळावं. तोपर्यंत त्यांना पर्यायी रोजगार मिळावा.
5) नव्या दामोदर नाट्यगृहात पूर्वीप्रमाणेच सहकारी मनोरंजन मंडळाचे कार्यालय तसंच तालमीची जागा असावी. त्यासाठी प्रस्तावित आराखड्यात त्याची नोंद असावी. नव्या नाट्यगृहाचे निर्माण होईपर्यंत संस्थेस वापरण्यायोग्य पर्यायी जागा मिळावी.


मुंबईतील परळ येथे असणारे सोशल सर्व्हिस लीगचे दामोदर नाट्यगृह 1 नोव्हेंबर 2023 पासून पुनर्बांधणीच्या कारणांनी बंद आहे. या ऐतिहासिक नाट्यगृहाच्या जागी खासगी शाळेची वास्तू उभारण्याचा  प्रस्ताव आहे. याविरोधात नाट्यकर्मींमध्ये नाराजी आहे. नाट्यगृह आहे त्याच जागी तब्बल 900 आसन क्षमतेचे असावे अशी मागणी करण्यात आली आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात या नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीच्या कामाचे पडसाद उमटले. त्यानंतर अधिवेशनात नाट्यगृहाच्या तोडकामाला स्थगिती देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, सोशल सर्व्हिस लीगने मे महिन्यापासून पुन्हा तोडकाम सुरू केले. दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी आता अभिनेते-निर्माते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी कलाकारांसह उपोषणाचा इशारा दिला आहे. 


संबंधित बातम्या


Prashant Damle Damodar Natyagruha : अभिनेते प्रशांत दामले यांचा उपोषणाचा इशारा, 100 वर्ष जुने नाट्यगृह वाचवण्यासाठी कलाकार रस्त्यावर उतरणार