मुंबई : अपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या श्रीदेवींचं काल निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात शोकाकुल वातावरण आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून ते विविध क्षेत्रातील दिग्गजांनी श्रीदेवींच्या निधनावर शोक व्यक्त केला. पण यातील काँग्रेस पक्षाचा शोकसंदेश ट्विटरवर ट्रोल झाला आहे.




काँग्रेसने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, “श्रीदेवींच्या निधनाच्या वृत्ताने आम्ही सर्वच दु:खी आहोत. त्या सर्वोत्तम अभिनेत्री होत्या. त्यांच्या अभिनयामुळे आजही त्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यांच्या चाहत्यांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. त्यांना 2013 मध्ये यूपीए सरकारच्या काळात पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.”

या शोकसंदेशातील शेवटच्या ओळीवरुन ट्विटर यूजर्सकडून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली जात आहे. अनेक यूजर्सनी या ट्वीटला रिट्विट करुन, काँग्रेस अभिनेत्रीच्या निधनावरुन राजकारण करत असल्याची टीका केली.


सर रविंद्र जडेजाने म्हटलंय की, , “त्यांना 2013 साली यूपीए सरकारच्या कार्यकाळात पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. पण तुम्ही गंभीर आहात का? एका दिग्गज अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहताना ही ओळ लिहिणे गरजेचे होते का? कृपया एखाद्याच्या मृत्यूवर राजकारण करु नका. तुम्ही मानवतेला काळीमा फासली आहे. तुमचा धिक्कार असो!”


आणखी एका यूजर्सने काँग्रेसच्या ट्वीटचा समाचार घेताना म्हटलंय की, “खरंच? यूपीए सरकारच्या काळात पद्म पुरस्कार दिला ही ओळ लिहिणं गरजेचं होतं का? काय फालतुगिरी आहे ही"

संदीप काकडीया नावाच्या ट्विटर यूजर्सने म्हटलंय की, “एखाद्या व्यक्तीच्या निधनाचं राजकारण करु नका. तुम्ही सर्व पातळ्या सोडल्या आहेत, हे माहिती होतं. पण तुम्ही अशी कृती कराल स्वप्नातही वाटलं नव्हतं.”

वरिष्ठ पत्रकार राशिद किदवई यांनीही या कृतीचा निषेध केला आहे. तसेच हे ट्विट तात्काळ डिलीट करा, अशी सूचनाही केली आहे.


काँग्रेसच्या ट्वीटचा भाजपकडूनही समाचार घेण्यात आला आहे. दिल्ली भाजपचे प्रवक्ते तेजिंदर बग्गा यांनी म्हटलंय की, “एखाद्याच्या निधनावर तरी राजकारण करु नका.”


दरम्यान, काँग्रेसचा हा शोकसंदेश ट्विटरवर ट्रोल झाल्यानंतर, पक्षाने तो तात्काळ डिलीट केला आहे. त्यानंतर नवीन ट्वीट करुन श्रीदेवींना पद्म पुरस्कार प्रदान केल्याची ओळ वगळण्यात आली.

संबंधित बातम्या

श्रीदेवींच्या निधनाने देश शोकाकुल, राष्ट्रपतींपासून दिग्गजांची श्रद्धांजली