मुंबई : बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांचं वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं. वयाच्या चौथ्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या श्रीदेवी यांनी गेल्याच वर्षी चित्रपट कारकीर्दीचा सुवर्ण महोत्सव पूर्ण केला. 'मॉम' हा त्यांचा हयातीत प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट होता. मात्र शाहरुख खानच्या आगामी 'झिरो' चित्रपटात श्रीदेवींचं अखेरचं दर्शन होणार आहे.


मॉम हा श्रीदेवी यांच्या कारकीर्दीतला 300 वा सिनेमा होता. श्रीदेवी यांच्या जिवंतपणी रीलिज झालेला तो अंतिम चित्रपट असला तरी प्रेक्षकांना श्रीदेवी यांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची अखेरची संधी ऑक्टोबर महिन्यात मिळणार आहे. शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या 'झिरो' सिनेमात त्या झळकणार आहेत.

झिरो सिनेमात श्रीदेवी यांचा कॅमिओ आहे, म्हणजेच त्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत. श्रीदेवी यामध्ये स्वतःचीच भूमिका साकारणार आहेत. झिरो चित्रपटातील एका फिल्मी पार्टी सीनमध्ये त्या दिसणार आहेत. या दृश्यात श्रीदेवींसोबत करिश्मा कपूर, आलिया भट आणि शाहरुख खान दिसतील. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच या दृश्याचं चित्रीकरण झालं होतं.

श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री 11-11.30 वाजताच्या सुमारास निधन झालं. यावेळी पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी त्यांच्यासोबत यूएईमध्ये होते, तर मोठी मुलगी जान्हवी मुंबईत होती. संयुक्त अरब अमिरातीतील दुबईपासून 45 मिनिटांवर असलेल्या रास अल खैमामध्ये श्रीदेवी सहकुटुंब गेल्या होत्या. पती बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्न समारंभासाठी कपूर कुटुंब तिथे गेलं होतं.
संबंधित बातम्या:

'रुप की रानी' श्रीदेवी यांची कारकीर्द

लेकीची बॉलिवूडमधली 'धडक' पाहण्यापूर्वी 'मॉम'ची एक्झिट

दुबईतील लग्नसोहळ्यातले श्रीदेवी यांचे अखेरचे फोटो

बिग बींना श्रीदेवीच्या निधनाची कुणकुण?

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन