मुंबई : 'चांदनी' अभिनेत्री श्रीदेवी बॉलिवूडच्या आसमंतातून निखळली. 50 वर्षांच्या कारकीर्दीत श्रीदेवी यांनी चांदनी, लम्हे, चालबाज, नगिना, इंग्लिश विंग्लिश यासारखे एकापेक्षा एक चित्रपट दिले. त्यापैकी सदमा चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांसह समीक्षकांच्याही पसंतीस उतरली. इतकंच काय तर हा सिनेमा पाहून श्रीदेवींची मोठी मुलगी जान्हवीने आईशी बोलणं टाकलं होतं.


कमल हासनसोबत 'सदमा' चित्रपटात श्रीदेवी यांनी मानसिक आघात झालेल्या एका तरुणीची भूमिका साकारली होती. श्रीदेवींची मुलगी जान्हवीने सहा वर्षांची असताना हा सिनेमा पाहिला. 'तू एक वाईट आई आहेस. तू त्याच्या (कमल हासन) सोबत चांगलं नाही केलंस' असं म्हणून जान्हवीने तीन दिवस आईशी बोलणं टाकलं होतं. 'मॉम' चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी श्रीदेवी यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला हा किस्सा सांगितला होता.

'सदमा'त श्रीदेवी यांनी साकारलेली व्यक्तिरेखा आपल्या कारकीर्दीतील सर्वात संवेदनशील भूमिका असल्याचं श्रीदेवींना मान्य नाही. 'एका लहान मुलीसारखी ती व्यक्तिरेखा होती, तर उलट कमल हासन यांची भूमिका अत्यंत इंटेन्स होती.' असं श्रीदेवी म्हणतात.

श्रीदेवी यांची कन्या जान्हवी करण जोहर दिग्दर्शित 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मुलीच्या बॉलिवूड डेब्यूबाबत श्रीदेवी कमालीच्या उत्सुक होत्या. मात्र चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच या 'मॉम'ने जगाचा निरोप घेतला.

करण जोहरसारखा दिग्दर्शक असल्यामुळे श्रीदेवींनी मोठ्या विश्वासाने त्याची निवड केली. मात्र सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्यानंतरही श्रीदेवी लेकीच्या भल्यासाठी वेळोवेळी सूचना करत होत्या.

श्रीदेवी यांना लेकीच्या चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता त्यांच्या ट्विटर हँडलवरुन दिसून येते. 16 नोव्हेंबर 2017 रोजी धडक सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आणि गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी ते आपल्या प्रोफाईलला पिन करुन ठेवलं. म्हणजेच श्रीदेवी यांनी कितीही ट्वीट केले, तरी धडकचं पोस्टर सर्वात वर दिसत राहील. मात्र लेकीचा पहिला सिनेमा पाहण्याचं त्यांचं स्वप्न अधुरंच राहिलं.

श्रीदेवी यांना बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार मानलं जातं. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम चित्रपटातही अभिनय केला आहे. गेल्याच वर्षी श्रीदेवी यांच्या चित्रपट कारकीर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली. 'मॉम' हा त्यांचा तीनशेवा चित्रपट श्रीदेवींच्या हयातीत प्रदर्शित झालेला अखेरचा सिनेमा ठरला. तर झिरो हा त्यांचा कॅमिओ असलेला सिनेमा ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होईल.

श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री 11-11.30 वाजताच्या सुमारास यूएईमध्ये निधन झालं. यावेळी पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी त्यांच्यासोबत होते, तर मोठी मुलगी जान्हवी मुंबईत होती. संयुक्त अरब अमिरातीतील दुबईपासून 45 मिनिटांवर असलेल्या रास अल खैमामध्ये श्रीदेवी सहकुटुंब गेल्या होत्या. पती बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्न समारंभासाठी कपूर कुटुंब तिथे गेलं होतं.
संबंधित बातम्या:

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन

श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार

'रुप की रानी' श्रीदेवी यांची कारकीर्द

लेकीची बॉलिवूडमधली 'धडक' पाहण्यापूर्वी 'मॉम'ची एक्झिट

दुबईतील लग्नसोहळ्यातले श्रीदेवी यांचे अखेरचे फोटो

बिग बींना श्रीदेवीच्या निधनाची कुणकुण?