मुंबई : ट्विटरवर लहान मुलांचा आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्याविरोधात मुंबई सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे. वकील आणि ‘जय हो’ फाऊंडेशनचे महासचिव आदिल खत्री यांनी ही तक्रार केली आहे.


‘जय हो’ फाऊंडेशनचे महासचिव आदिल खत्री आणि अध्यक्ष अफ्रोज मलिक यांनी मुंबई पोलीस सायबर सेल आणि महिला आणि बालविकास विभागाकडे तक्रार दिली. ऋषी कपूर यांनी पोस्ट केलेला लहान मुलांचा व्हिडिओ अश्लील आणि आक्षेपार्ह असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

दरम्यान ऋषी कपूर यांनी हा आरोप फेटाळला आहे. ही लोकशाही आहे, कुणी काहीही बोलू शकतं, मला यावर फार बोलायचं नाही, असं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

ऋषी कपूर हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. हरियाणात काल राम रहीमच्या समर्थकांनी केलेल्या हिंसेवर ट्वीट केल्यानंतरही ऋषी कपूर चांगलेच चर्चेत आले होते. त्यांनी सर्व तथाकथित बाबांना फटकारलं होतं.