मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमाने दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी 120 कोटींचा आकडा पार केला आहे. दुसऱ्या आठवड्यात 120 कोटींपेक्षा जास्त कमाई करताच या सिनेमाने अभिनेता सलमान खानच्या ‘ट्यूबलाईटचा’ही विक्रम मोडला.
टॉयलेट एक प्रेम कथा पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा अक्षय कुमारचा पहिलाच सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात म्हणचे केवळ सात दिवसात 96.5 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्यात इतर सिनेमांनी टक्कर दिलेली असतानाही या सिनेमाने 28 कोटींची कमाई केली.
या वर्षात बाहुबली 2 या सिनेमाने सर्वाधिक कमाई (511 कोटी) केली आहे. त्यानंतर रईस (139 कोटी), काबिल (126 कोटी) आणि आता ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ने 124 कोटींची कमाई केली आहे. येत्या काही दिवसातच हा सिनेमा ‘काबिल’च्याही पुढे जाण्याची शक्यता आहे.
टॉयलेट एक प्रेम कथा हा एक सामाजिक संदेश देणारा सिनेमा आहे. केवळ 18 कोटी रुपये एवढ्या बजेटमध्ये हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या या सिनेमाने बजेटचा खर्च अगोदरच वसूल केला आहे.
‘टॉयलेट एक प्रेम कथा’ भारतात 3 हजार आणि परदेशात 590 स्क्रीनवर रिलीज झाला आहे.या सिनेमाच्या कमाईचा वेग अजूनही कायम आहे. कारण बॉक्स ऑफिसवर प्रेक्षक या सिनेमासाठी अजूनही गर्दी करत आहेत.
टॉयलेट एक प्रेम कथाच्या यशानंतर अक्षय कुमारही खुश आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना आवडेल की नाही माहित नव्हतं, मात्र शौचालयाची समस्या घरा-घरात समजावून सांगणं हे ध्येय होतं, असं अक्षय कुमारने एका व्हिडिओ मेसेजद्वारे म्हटलं आहे.
हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तर काम करतच आहे. पण महत्त्वाचं म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून उघड्यावर शौचाला बसण्याची जी परंपरा होती, ती मोडीत निघण्यासही मदत होत असल्याचं अक्षय कुमार म्हणाला.
एका अहवालानुसार 8-9 महिन्यांपूर्वी उघड्यावर शौचाला बसण्याचं प्रमाण 54 टक्के होतं, मात्र आता हा आकडा 34 टक्के झाला आहे, अशी माहितीही अक्षय कुमारने दिली. मनोरंजनाच्या माध्यमातून मी मेसेज देण्याचा प्रयत्न केला, असं अक्षय कुमार म्हणाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानापासून हा सिनेमा प्रेरित असल्याचं बोललं जातं. ज्यामध्ये शौचालयाची समस्या मांडण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील एका गावाची कहाणी यामध्ये दाखवण्यात आली आहे.
'टॉयलेट एक प्रेम कथा'ने 'ट्यूबलाईट'लाही मागे टाकलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Aug 2017 11:48 PM (IST)
या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात म्हणचे केवळ सात दिवसात 96.5 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्यात इतर सिनेमांनी टक्कर दिलेली असतानाही या सिनेमाने 28 कोटींची कमाई केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -