सोलापूर : स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे (Pranit More) याला अभिनेता वीर पहारिया (Veer Pahariya) याच्यावर विनोद केल्यामुळे मारहाण झाली होती. या मारहाणीनंतर त्याने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे या मारहाणीचा सर्व प्रकार त्याने सोशल मीडियावर सांगितला होता. परिणामी या प्रकरणीची महाराष्ट्रभर चर्चा झाली होती. त्यानंतर आता याच मारहाण प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रणित मोरे याला मारहाण करण्याचे आरोप असलेल्या तनवीर शेख याला अटक करण्यात आली आहे.
2 फेब्रुवारी रोजी झाली होती मारहाण
स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी तनवीर शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोलापूर शहर पोलिसांनी आरोपी तनवीर शेखच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रणित मोरे याला 2 फेब्रुवारी रोजी सोलापुरात बेदम मारहाण झाली होती.
नेमके प्रकरण काय आहे?
सिनेअभिनेता आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नातू वीर पहारिया याच्यावर प्रणित मोरे याने विनोद केला होता. विनोद केल्याचा राग मनात धरून नंतर एका जमावाने प्रणित मोरे याला मारहाण केली होती. तसेच यानंतर वीर पहारिया याच्यावर विनोद करायचा नाही, असंदेखील बजावलं होतं. हा सर्व प्रकार घडल्यानंतर प्रणित मोरे यांनी पोलिसात रितसर तक्रार केली होती. पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेत मुख्य आरोपी तनवीर शेख याला ताब्यात घेतलं आहे.
आता पुढे नेमकं काय घडणार?
दोनच दिवसांपूर्वी प्रणित मोरेनी मुख्य आरोपीला अद्याप अटक होत नसल्याबाबत सोशल माध्यमात खंत व्यक्त केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, या प्रकरणात समोर नेमकं काय घडतंय, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :
धक्कादायक! वीर पहारियावर विनोद केला म्हणून कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण