मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास जिवंत करणारा “छावा” (Chhaava) चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. या भव्य ऐतिहासिक चित्रपटाच्या निमित्ताने, बॉलीवूडचा दमदार अभिनेता विकी कौशल आज चाहत्यांच्या भेटीसाठी संभाजीनगरमध्ये पोहोचला आहे. विशेष म्हणजे संभाजीनगरमधील क्रांती चौकात जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी, विकी कौशलला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. एकीकडे विकी कौशल (Vickey kaushal) संभाजीनगरमध्ये आला असून दुसरीकडे छावा चित्रपटातील गाण्याचा टीझर लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे छावा सिनेमाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या लेझीम डान्सवरुन वाद उफाळला होता. आता, या चित्रपटातील गाण्यातून संभाजीराजेंचा लेझीम डान्स वगळण्यात आल्याचं गाण्याच्या टीझरमध्ये दिसून येते.
छावा सिनेमातील दुसरं नवं गाणं लाँच करण्यात आलं असून आया रे तुफान... असे या गाण्याचे शब्द आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान शौर्यगाथेवर आधारित हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत असून काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हा या ट्रेलरमध्ये संभाजीराजे लेझीम खेळताना, डान्स करत असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे महाराणी सईबाई याही त्यांच्यासमवेत लेझीम खेळत असल्याचं दिसून आलं. त्यावरुन, चांगलाच वाद उफाळून आला होता. शिव-शंभु भक्तांनी महाराजांच्या नृत्याला विरोध केला होता. त्यानंतर, चित्रपटाच्या दिग्दर्शकाने शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन लेझीम डान्स हटविण्याबाबत सांगितलं होतं. त्यानुसार, आज लाँच झालेल्या गाण्यात संभाजीराजे महाराणी सईबाई यांच्यासमवेत दिसून येतात. मात्र, तो लेझीम डान्स वगळण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, छावा चित्रपटात शंभुराजेंची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचला आहे. येथील क्रांती चौक, नूपुर चित्रपटगृहात तो चाहत्यांसोबत वेळ घालवणार आहे. शौर्य, इतिहास आणि कलेचा मिलाफ असलेला “छावा”, शंभूराजे संभाजी महाराजांचा पराक्रम आणि त्याग उलगडून दाखवणारा “छावा” प्रेक्षकांच्या हृदयात इतिहासाचा नवा गंध रुजवणार आहे. त्यामुळे, चाहत्यांना व मावळ्यांना 14 फेब्रुवारी रोजीच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे.
हेही वाचा
महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा उडवून टाकू; हाती बंदूक घेऊन अजित दादांचा मिश्कीलपणे इशारा