Amol Kolhe Reaction on Chhaava Controversy : छावा चित्रपटाच्या टीझरवरुन नवा वादंग निर्माण झाला आहे. चित्रपटातील छत्रपची संभाजी महाराजांच्या लेझीम सीनवर शिव-शंभूप्रेमींनी निषेध नोंदवला आहे. या वादावर खासदार अभिनेता अमोल कोल्हे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाला कुठेही गालबोट लागेल, असा कोणतीही बाब चित्रपटामध्ये नको. सर्व शिवभक्त आणि शंभूभक्तांची ही भावना असल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. स्वराज्यरक्षक संभाजी मालिका करताना आपल्याला कोणत्या अग्नीदिव्यांना सामोरं जावं लागलं आहे, हे मला माहित आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
रिलीजआधीच 'छावा' चित्रपटासमोर विघ्न
राष्ट्रवादी नेते आणि अभिनेता अमोल कोल्हे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "ट्रेलरमध्ये जे दृश्य दाखवण्यात आलं आहे, ते चित्रपटामध्ये कोणत्या संदर्भाने दाखवण्यात आलं आहे. निर्माते आणि दिग्दर्शक यांनी वेळीच स्पष्टीकरण दिल्यास या वादाला अकारण तोंड फुटण्याआधीच हा वाद क्षमवता येऊ शकेल. दुसरी बाब, मी उदय सामंत यांच्या भूमिकेशी काही प्रमाणात सहमत आहे की, छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाला कुठेही गालबोट लागेल, अशी कोणतीही गोष्ट चित्रपटात असून नये, अशी प्रत्येक शिव-शंभूभक्ताची भावना आहे".
'छावा' चित्रपटाच्या वादावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
अमोल कोल्हे यांनी पुढे सांगितलं की, "स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका करताना कुठल्या-कुठल्या अग्नी दिव्यातून जावं लागलं, याची मला पूर्ण कल्पना आहे. अनेक वर्ष काही प्रमाणात मलिन करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास उजळपणे समोर आणण्यामध्ये अनेक इतिहास संशोधक, इतिहासकार आणि कादंबरीकार, अनेक संघटना यांचे खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे फक्त मनोरंजनाच्या नावाखाली किंवा व्यावसायिकतेच्या नावाखाली छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र चुकीच्या पद्धतीने समोर आणू नये किंवा त्यांच्या इतिहासाला गालबोट लागू नये, ही प्रत्येकाची भावना आहे".
काय म्हणाले अमोल कोल्हे?
ते पुढे म्हणाले, "इतक्या मोठ्या प्रमाणावर चित्रपट बनवणं, ही सोपी गोष्ट नाही, हेही मान्य करावं लागेल. कारण मराठी इंटस्ट्रीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांवरील सिनेमा इतक्या मोठ्या बजेटचा चित्रपट येऊ शकत नाही, कारण यामागे अनेक व्यावसायिक कारणे आहेत. पण, हे करत असतानाही प्रत्येक निर्मात्याची नैतिक जबाबदारी आहे की, जेव्हा आपण महापुरुषांवर कोणतीही कलाकृती करतो, तेव्हा त्यामध्ये फक्त व्यावसायिक दृष्टीकोन असता कामा नये, तर आपण समाजाचं देणं लागतो आणि या महापुरुषांबद्दलची कृतज्ञता कायम ठेवायला हवी", असंही कोल्हे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :