Chhaava Movie Controversy : छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील बिग बजेट चित्रपट 'छावा' सध्या वादात सापडला आहे. छावा चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून याचा शिवप्रेमींनी निषेध केला आहे. टीझरमधील लेझीम खेळण्याच्या सीनवरुन वाद पेटला आहे. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत असताना उदयनराजे भोसले यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना फोन करुन आक्षेपार्ह सीन डिलीट करण्यास सांगितलं आहे.
उदयनराजे भोसले यांचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना फोन
उदयनराजे यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधताना म्हटलं की, "मी टीझर बघितला, त्यावरुन वाद सुरु झालाय. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जनतेच्या भावना आहेत. त्यांना आपण देवाच्या स्थानी मानतो, त्यामुळे अनेकांच्या प्रतिक्रिया येतात, हे नको ते नको. तुम्ही दिग्दर्शन सुंदर केलंय, पण कथेबाबत आपण इतिहास तज्ज्ञांना विचारात घेऊन हे केलं, तर कारण नसताना निर्माण झालेली कॉन्ट्रोव्हर्सी ती संपेल. हा चित्रपट भावी पिढीला हा चित्रपट दाखवणे गरजेचं आहे". हे संभाषण न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात चित्रित झालं आहे.
"आपला इतिहास विसरुन चालणार नाही"
"आयुष्यात पुढे वाटचाल करत असताना आपला इतिहास विसरुन चालणार नाही. इतिहास आपला शिक्षक आहे, त्यातून आपल्याला खूप शिकायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आजच्या तरुणाईला आपला इतिहास समजणं फार गरजेचं आहे. हा चित्रपट प्रदर्शित होणं तरुणांसाठी महत्त्वाचं आहे. इतिहासावर फारसं कोण लक्ष देत नाही, त्यामुळे हा इतिहास पुढच्या पिढीला कळायला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
"तो सीन डिलीट करा"
"चित्रपटातील लेझीमच्या सीनवर वाद सुरु झाला आहे, जे काही झालं असेल, जो कुणाचा आक्षेप असेल, ते दुरुस्त करुन तो चित्रपट तुम्ही लवकर प्रदर्शित करावा, अशी माझी आणि सर्वांचीच इच्छा आहे. बोलणं सोपं असतं, पण, करणं तितकंच कठीण असतं. करत तर कोण नाही, पण जे करतात त्यांच्या मार्गात अडचणी आणतात. याचा निषेध करण्यापेक्षा तुमच्यासोबत बोलून मार्गा काढायला हवा होता. ज्या कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल विचार करुन, तो सीन डिलीट करा, तसं केल्यास काही अडचण येणार नाही", असं उदयनराजे लक्ष्मण उतेकर यांना म्हणाले.
लक्ष्मण उतेकर काय म्हणाले?
यावर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी नक्कीच असं उत्तर दिलं. ते पुढे म्हणाले की, "3 फेब्रुवारीपर्यंत चित्रपटाचं पोस्ट प्रोडक्शन पूर्ण करतोय. चित्रपटाचे VFX, डबिंग सर्व काम सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आपलं दैवत आहेत, आपले महाराज, आपला राजा काय होता, हे अख्ख्या जगाला कळावं, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. राजेंचा मान, राजेंची प्रतिष्ठा राखत मी प्रत्येक फ्रेम शूट केली आहे". यावेळी उदयनराजे यांनी चित्रपटाच्या टीझरमधील सिंहाच्या सीनचं कौतुकही केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :