Chhaava Film : सध्या विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेल्या छावा या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा चालू आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर अनेकांनी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडणार, असं भाकित केलंय. दुसरीकडे हा चित्रपट ट्रेलरमधील काही दृश्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. अनेकजण या चित्रपटावर टीकाही करत आहेत. असे असतानाच एक मराठमोळा अभिनेता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्याने या चित्रपटात भूमिका करण्यास थेट नकार दिला आहे. विशेष म्हणजे नकाराचं कारण ऐकून अनेकाना अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.
छावातील भूमिकेवर केले भाष्य
छावा हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरतोय. महाराष्ट्रापासून ते देशभरातील इतरही राज्यांत या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. असे असतानाच आता मराठमोळा अभिनेता अशोक शिंदे यांनी या चित्रपटात एक पात्र साकारण्यास थेट नकार दिल्याचं समोर आलं आहे. 'मज्जा' या यूट्यूब चॅनेलवरील अशोक शिंदे यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या मुलाखतीत अशोक शिंदे हे छावा या चित्रपटावर तसेच त्यांना ऑफर करण्यात आलेल्या रोलवर भाष्य करताना दिसत आहेत.
अशोक शिंदे नेमकं काय म्हणाले?
अशोक शिंदे हे मराठी कलाकार आणि त्यांना बॉलिवुडमध्ये मिळणाऱ्या कामाचा दर्जा यावर भाष्य करताना दिसत आहेत. मराठी प्रेक्षकांचे एवढे सारे प्रेम मिळत असताना बॉलिवुडमध्ये कमी दर्जाची भूमिका का साकारावी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याच मुद्द्यावर बोलताना त्यांनी छावा या चित्रपटाचे उदाहरण दिले आहे.
लक्ष्मण उतेकर यांनी एक रोल ऑफर केला होता
अशोक शिंदे या मराठमोळ्या अभिनेत्याने छावा या चित्रपटात एक भूमिका करण्यास दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना थेट नकरा दिला होता. त्याचं कारणही तसंच खास होतं. "लक्ष्मण उतेकर हे माझे चांगले मित्र आहेत. आता त्यांचा छावा हा चित्रपट येतोय. त्यांनी मला या चित्रपटावेळी विचारलं होतं. मात्र सारं काही तिच्यासाठी या मालिकेसाठी माझा झी सोबत करार होता. त्यावेळी मला लक्ष्मण उतेकर यांनी एक रोल ऑफर केला होता. त्या रोलसाठी त्यांनी माझं समोर पोस्टर लावलं होतं. त्या पोस्टर्समध्ये अनिल कपूर होते. ते औरंजेबाची भूमिका साकारणार होते. विकी कौशल संभाजी महाराजांची भूमिका करणार होता. रश्मिका मंदाना होती. अशा सगळ्या कलाकारांचे फोटो लावलेले होते," अशी माहिती अशोक शिंदे यांनी दिली.
गेस्ट अपिअरन्स असेल तर आपण समजून घेऊ, पण...
तसेच, "एक कलाकार म्हणून त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. सोबतच एक दिग्दर्शक म्हणून माझही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. आम्ही चांगले मित्र आहेत. त्यांनी हा रोल फक्त एका दिवसाचा आहे, असं मला सांगितलं. मग मी त्यांना विचारलं की लक्ष्मणराव मी ही भूमिका का करावी? ते म्हणाले की माझी इच्छा आहे. गेस्ट अपिअरन्स असेल तर आपण समजून घेऊ. पण मी ती भूमिका का करावी असा प्रश्न मला पडलं. मग ते म्हणाले की त्याला काय हरकत आहे. मग मी त्यांना सांगितलं की माझे 13 कोटी प्रेक्षक आहेत. या प्रेक्षकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे, असं मी त्यांना सांगितलं," असंही अशोक शिंदे म्हणाले.
मी एखादी छोटी भूमिका का करावी?
त्यांनी ऑफर केलेला रोल हा नकारात्मक होता. ते पात्र संभाजी महाराजांबद्दल माहिती देतो आणि राणी सरकार त्याला हत्तीच्या पायदळी देतात, असं ते पात्र होतं. मग मी त्यांना सांगितलं की नाराज होऊ नका. मी माझ्या मतांवर ठाम राहिलो. मला ते योग्य वाटलं नाही. मला मराठी प्रेक्षकांवर अन्याय केल्यासारखं वाटलं. मी एखाद्या चित्रपटात मुख्य भूमिका करत असेल तर मी एखादी छोटी भूमिका का करावी?" असा सवालही त्यांनी केला. त्यांच्या याच ठाम भूमिकेचे सगळीकडे कौतुक होत आहे.
दरम्यान, येत्या 14 फेब्रुवारी रोजी छावा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा :
भगवा वस्त्र, रुद्राक्ष घालून महाकुंभ मेळ्यात पोहचली ममता कुलकर्णी आणि घेतला सन्यास