मुंबई : लहानपणीचे फोटो पाहायला कोणाला आवडत नाही? त्यात हे फोटो तुमच्या लाडक्या फिल्मस्टार्सचे असतील तर? सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये आघाडीचे अनेक बॉलिवूड कलाकार पाहायला मिळत आहेत, मात्र त्यामध्ये नेमका कोणता अभिनेता कोण आहे, हे शोधण्यासाठी तुम्हाला डोक्याचा किस पाडावा लागेल.


प्रख्यात अभिनेत्री रिना रॉय चिमुरड्यांच्या घोळक्यात बसल्याचा एक फोटो झहीर हसन नावाच्या यूझरने शेअर केला आहे. यामध्ये रिना यांच्या भोवती हृतिक रोशन, सुनैना रोशन, तुषार कपूर, एकता कपूर, ट्विंकल खन्ना, रिंकी खन्ना, अहलाम खान, शादाब खान ही स्टारकिड्स दिसत आहेत.

सध्या प्रसिद्ध असलेले हे सेलिब्रेटी खरंतर त्यावेळी आघाडीवर असलेल्या कलाकारांची मुलं. अभिनेते राकेश रोशन यांचा मुलगा अशी हृतिकची ओळख, तर तुषार आणि एकता ही जम्पिंग जॅक जितेंद्र यांची पोरं. ट्विंकल आणि रिंकी खन्ना यांनाही सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यामुळे ओळख होती, तर अहलाम हा गब्बर अभिनेते अमजद खान यांचा सुपुत्र.

रिना रॉय यांनी हे फोटोशूट का केलं, एखाद्या पार्टीमध्ये रिना रॉय यांनी सहकलाकारांच्या मुलांसोबत फोटो काढले का, या प्रश्नांच्या उत्तराची उत्सुकता कायम आहे.