Boney Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांचे 2018 मध्ये निधन झाले. श्रीदेवी यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाला तसेच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. श्रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणीही त्यांचे पती बोनी कपूर यांची बरीच चौकशी झाली होती. बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत सांगितलं. 


'द न्यू इंडियन'ला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी सांगितले की, श्रीदेवी या स्ट्रिक्ट डाएट फॉलो करत होत्या. ज्यामध्ये मीठाचा समावेश नव्हता. यामुळे  त्या कधी कधी बेशुद्ध देखील पडत होत्या.


बोनी कपूर यांनी सांगितले की, 'हा नैसर्गिक मृत्यू नव्हता तर अपघाती मृत्यू होता. मी याबद्दल न बोलण्याचा निर्णय घेतला होता कारण माझी चौकशी केली गेली तेव्हा मी सुमारे 24 किंवा 48 तास याबद्दल बोललो होतो.'


'मी लाय डिटेक्टर टेस्ट आणि इतर सर्व चाचण्या केल्या. आणि त्यानंतर आलेल्या अहवालातही हा अपघाती मृत्यू असल्याचे म्हटले आहे.' असं बोनी कपूर यांनी सांगितलं.


पुढे बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्याबद्दल सांगितले, 'ती अनेकदा उपाशी राहायची. तिला चांगले दिसायचे होते. तिला चांगल्या शेपमध्ये राहायचे होते, जेणेकरून ती ऑन-स्क्रीन चांगली दिसेल. तिचे माझ्याशी लग्न झाल्यापासून तिला एक-दोन वेळा ब्लॅकआउट झाले होते आणि डॉक्टर तिला कमी रक्तदाबाचा त्रास असल्याचे सांगितले होते.'






श्रीदेवी यांचे खरे नाव ‘श्री अम्मा यंगर अय्यपन’ आहे.  श्रीदेवी यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून 'कंधन करुणाई' या तमिळ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.


'मिस्टर इंडिया' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मैत्री झाली. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांनी  1996 मध्ये लग्नगाठ बांधली. श्रीदेवी आणि बोनी कपूर  यांना  जान्हवी कपूर, खुशी कपूर या दोन मुली आहे.चांदनी, ‘मिस्टर इंडिया’, ‘हिम्मतवाला’, 'सोलहवा सावन' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये श्रीदेवीनं काम केलं. श्रीदेवी यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली होती. श्रीदेवी यांच्या मुली जान्हवी कपूर आणि  खुशी कपूर या दोघी देखील अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. 


महत्वाच्या इतर बातम्या :


'शेवटचा फोटो'; श्रीदेवींच्या आठवणीत बोनी कपूर झाले भावूक