Bollywood Singer Struggle Days : बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक गायकांनी मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. गायक कैलाश खेर (Kailash Kher) आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. पण कैलाशसाठी हे यश मिळवणं सोपं नव्हतं. प्रचंड मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर त्याने आज बॉलिवूडमध्ये आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूडच्या या लोकप्रिय गायकाने आपल्या आयुष्यात मोठा संघर्ष पाहिला आहे. एकेकाळी आयुष्य संपावण्याचाही त्याने प्रयत्न केला होता. आज बॉलिवूडच्या लोकप्रिय गायकांमध्ये कैलाश खेरचा समावेश होतो.
वयाच्या 14 व्या वर्षी सोडलं घर
कैलाश खेरचा जन्म दिल्लीत झाला आहे. बालपणीपासूनच गायक होण्याची त्याची इच्छा होती. वयाच्या 14 व्या वर्षी त्याने घर सोडलं होतं. एका चांगल्या गुरूच्या शोधात त्याने घर सोडलं होतं. कैलाशने संगीतक्षेत्रात यावं असं त्याच्या घरच्यांना अजिबात वाटत नव्हतं. घरातून बाहेर पडल्यानंतर कैलाश क्लासिकल आणि फोक म्यूझिक शिकला. ऋषिकेश आणि हरिद्वारमध्ये तो मोठा झाला. त्यावेळी रस्त्यावर झोपण्याची त्याच्यावर वेळ आली होती. पुढे चांगला गुरू न मिळाल्याने घरच्यांचं ऐकूण त्याने उद्योग सुरू केला.
... अन् केला आयुष्य संपावण्याचा प्रयत्न
ANI ला दिलेल्या मुलाखतीत कैलाश खेर म्हणाला होता की,"जगण्यासाठी मी वेगवेगळी कामे केली आहेत. वयाच्या 20-21 व्या वर्षी मी दिल्लीत एक्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. मी जर्मनीमध्ये हैंडिक्राफ्ट्स पाठवत असे. काही कारणाने हा उद्योग बंद करावा लागला. उद्योगक्षेत्रात आलेल्या अपयशामुळे मी पंडित होऊन ऋषिकेशला गेलो. काहीतरी गमावल्यासारखं मला सारखं वाटत असे. त्यावेळी कोणत्याच गोष्टीत मी यशस्वी होत नसे. एक दिवस मी गंगा नदीत आयुष्य संपावण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी एका व्यक्तीने मला वाचवलं. पोहायला येत नाही, मग पाण्यात उडी का मारली? असं ती व्यक्ती मला म्हणाली. दरम्यान मी त्याला उत्तर दिलं,"आयुष्य संपवायला".
कैलाश खेरने केलाय नैराश्याचा सामना
कैलाश खेरने एक दिवस स्वत:ला एका खोलीत बंद केलं होतं. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत कैलाश खेर म्हणालेला,"मुंबईत आलो तेव्हा माझं वय 30 वर्षे होतं. त्यावेळी मला गोष्टी कळत होत्या. ऋषिकेशला गेलो तेव्हा माझं वय 20 वर्षे होतं. त्यावेळी मी प्रचंड स्ट्रगल केलं आहे. नैराश्याचादेखील सामना करावा लागला आहे. पुढे मुंबईत आल्यानंतर मी खूप मेहनत केली आणि मोठा स्टार झालो".
कैलाश खेरने तेरी दीवानी, सैंया, चांद सिफारिश, यूं ही चला चल राही, या रब्बा, अर्जियां, पिया घर आएंगे सारखे अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. अल्लाह के बंदे या गाण्याने त्याला मोठा ब्रेक मिळाला. मीडिया रिपोर्टनुसार, कैलाश खेर आजच्या घडीला एक गाणं गाण्याचे 10 लाख रुपये मानधन घेतो.
संबंधित बातम्या