मुंबई : म्यूजिक लेबल टिप्स इंडस्ट्रिडचे मालक आणि बॉलिवूड निर्माते रमेश तौरानी हे बनावट लसीकरणाच्या मोहिमेचे शिकार झाल्याचं उघडकीस आलं आहे. रमेश तौरानी यांच्या टिप्स या कंपनीतील 365 कर्मचाऱ्यांचे या बनावट लसीच्या माध्यमातून लसीकरण करण्यात आल्याचं समोर आल्याने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अशा प्रकारची अनेक प्रकरणं उघडकीस येत आहेत. 


रमेश तौरानी म्हणाले की, "आम्ही 29 मे आणि 3 जून रोजी आपल्या स्टाफ, फिल्मशी संबंधित यूनिटच्या अनेक लोकांचे आणि कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा कार्यक्रम घेतला होता. परंतु अद्याप आम्हाला त्याचे कोणतेही सर्टिफिकेट देण्यात आलं नाही. हे सर्टिफिकेट 12 जून रोजी येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं."


रमेश तौरानी यांनी त्यांच्या 365 कर्मचाऱ्यांचे प्रति डोस 1200 रुपये या हिशोबाने पैसे दिले होते. त्यावरील जीएसटीची रक्कमही भरली होती. या घटनेची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली असून पोलीस आता त्याचा तपास करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 


रमेश तौरानी यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या बनावट लसीकरण प्रकरणामध्ये आता एसपी इव्हेन्ट मॅनेजमेंटचे संजय गुप्ता तसेच कोकीळाबेन अंबानी रुग्णालयातील कर्मचारी रमेश पांडे आणि महेंद्र सिंह यांचं नाव समोर आलं आहे. या एसपी इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीकडून आतापर्यंत अनेक मोठ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये लसीकरणाची मोहीम पार पाडण्यात आली आहे. या सर्व मोहीम या बनावट लसीकरणाच्या असतील असं पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. 


अंधाधुन या चित्रपटाची निर्मिती करणारी कंपनी मॅच बॉक्स पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनाही बनावट लस देण्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणानंतर बॉलिवूडमधील अनेकजणांना बनावट लस देण्यात आल्याचं समोर येत आहे.


महत्वाच्या बातम्या :