पुणे : काही दिवसांपूर्वी पिकनिकसाठी घराबाहेर पडलेल्या पुण्यातील शेख कुटुंबातील तिघांचाही मृत्यू झाला आहे. बेपत्ता असलेल्या आबीद शेख यांचा मृतदेह पुण्याजवळील खानापूर गावातील एका नदीत आढळून आला. आबीद शेख यांच्या मृतदेहासोबत आढळलेल्या कागदपत्रांचा तपास पोलीस करत असून या तीन मृत्यूंमागे काय कारण आहे हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


पुण्यातील सासवडमध्ये 15 जून रोजी सकाळी आलिया शेख या महिलेचा मृतदेह आढळला होता तर त्याच दिवशी संध्याकाळी नवीन कात्रज बोगद्याजवळ तिच्या अयान शेख नावाच्या आठ ते दहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला. तर आलिया यांचे पती आबीद शेख बेपत्ता असल्याने या प्रकरणाचं गूढ अधिकच वाढलं होतं. 


परंतु तीन दिवसांनी म्हणजेच आज (18 जून) आबीद शेख यांचा मृतदेह पुण्याजवळील खानापूर गावातील एका नदीत सापडला. त्यासोबतच काही कागदपत्रे सापडले असून त्यात आलिया शेख यांच्या आधार कार्ड आणि ओळखपत्राचा समावेश आहे. 


पुण्यातील सासवडमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या महिलेच्या मुलाचीही हत्या, पती अद्यापही बेपत्ता


मूळचं मध्य प्रदेशमधील असलेलं हे कुटुंब पुण्यातील धानोरी भागात राहात होतं. आबीद शेख एका कंपनीत बॅंक मॅनेजर म्हणून काम करत होते. 11 जून रोजी आबीद शेख यांनी पिकनिकला जाण्यासाठी ब्रीझा कार भाड्याने घेतली होती. हे कुटंब पिकनिकसाठी बाहेर पडलं खरं पण 15 जून रोजी सकाळी सासवड गावात आलिया यांचा तीक्ष्ण हत्याराने वार केलेला मृतदेह आढळून आला. सासवड पोलीस त्या खुनाचा तपास करत असतानाच संध्याकाळी नवीन कात्रज बोगद्यालगत एका आठ ते दहा वर्षांच्या त्यांचा मुलाचाही मृतदेह आढळून आला. तर आबीद शेख यांनी भाड्याने घेतलेली ब्रीझा कार पुणे-सातारा रस्त्यावर एका चित्रपटागृहासमोर सोडून दिल्याचं आढळून आली होती. 


पिकनिकसाठी घराबाहेर पडल्यानंतर नेमकं काय झालं? पती-पत्नी आणि त्यांच्या मुलाची हत्या का झाली याचा तपास आता पोलीस करत आहेत. खरंतर बेपत्ता असलेल्या आबीद शेख यांचा ठावठिकाणा लागल्यावरच या प्रकरणावरुन पडदा उठण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु आता त्यांचाही मृतदेह आढळल्याने या तिहेरी हत्येचं गूढ उकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.