Bollywood Movie Interesting Facts : भारतीय सिनेसृष्टीतील चित्रपटांमध्ये गाणी महत्त्वाची असतात. गाण्यांशिवाय चित्रपट म्हणजे काहीसे अपूर्ण वाटतात. बॉलिवूडच्या प्रत्येक चित्रपटात चार-पाच गाणी असतात. फार कमी बॉलिवूड चित्रपटात एकाही गाण्याचा समावेश नाही. हॉलिवूड चित्रपटातील गाण्याचा एक वेगळा जॉनर असतो. बॉलिवूडमधील चित्रपटात 5-6 गाणी असणे म्हणजे सामान्य बाब आहे. मात्र, एका बॉलिवूड चित्रपटात एक, दोन, पाच नव्हे तर तब्बल 71 गाणी आहेत. या चित्रपटाच्या नावावर विक्रमाची नोंद आहे.
71 गाणी असलेल्या चित्रपटाचे नाव इंद्रसभा आहे. गाण्याच्याबाबतीत या चित्रपटाच्या नावावर विक्रम आहे आणि हा विक्रम कोणी मोडेल, याची शक्यताही कमीच आहे. हा चित्रपट उर्दू नाटक इंद्रसभावर आधारीत होते. अगा हसन खान यांनी पहिल्यांदा या नाटकात काम केले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन जामाहेदजी जहांगीरजी मदन यांनी केले होते. या चित्रपटात निसार, जहांआरा कज्जन, अब्दुल रहमान काबुली आणि मुख्तार बेगम हे मुख्य भूमिकेत होते.
या चित्रपटात शास्त्रीय आणि लोकगीते अतिशय सुरेख संगीतबद्ध करण्यात आली होती. चित्रपटात ठुमरी, गझल, गाणी, चौबोला (पाकिस्तानी काव्यपरंपरेतील ओळी, ज्या लोकगीतांमध्ये वापरल्या जातात) आणि पद्यांचा समावेश होता. या सर्व गोष्टी एकत्र ठेवल्यास चित्रपटात एकूण 71 गाणी असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटातील काही मोजक्याच गाण्याच्या प्रिंट्स सध्या उपलब्ध आहेत.
भारतातील पहिला बोलपट असलेल्या आलम आरामध्ये 7 गाणी होती. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या 'इंद्रसभा' चित्रपटात 71 गाणी होती.
गिनीज बुक ऑफ रेकोर्डमध्ये नोंद
इंद्रसभा चित्रपटातील 71 गाण्यांना संगीत दिग्दर्शक नागरदारप नायक यांनी स्वरबद्ध केले होते. या चित्रपटाचे नाव गिनीज बुक रेकोर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. एकाच चित्रपटात सर्वाधिक गाणी असण्याचा विक्रम या चित्रपटाच्या नावावर आहे.
या चित्रपटांच्या नावावरही विक्रम
1943 मध्ये प्रदर्शित झालेल्या शंकुतला या चित्रपटात 42 गाणी होती. त्यानंतर 90 च्या दशकात काही चित्रपटांमध्ये 10 ते 14 गाणी असायची. सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'हम आपके है कौन?'मध्ये 14 गाणी होती. इम्तियाज अलीने दिग्दर्शित केलेल्या रॉकस्टार चित्रपटात 14 गाणी होती. तर, सुभाष घई यांच्या ताल चित्रपटासाठी संगीतकार ए.आर.रहमान यांनी 12 गाणी संगीतबद्ध केली होती. या चित्रपटांची गाणी सुपरहिट झाली होती. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही हिट झाली होती.