मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक. त्यांच्या सुपुत्राचा अनंत अंबानीचा (Anant Ambani) विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. संगीत सोहळ्यापासून रिसेप्शनपर्यंतच्या या सोहळ्याचं सेलिब्रेशन सध्या जोरात सुरु आहे. या शाही लग्नाचा कसा आहे राजेशाही थाट कसा होता, ते जाणून घ्या.


शाही लग्नाचा शाही थाट


अनंत अंबानींच्या लग्नाला शाही वऱ्हाडी पोहोचले होते. लग्नाच्या खर्चाचं उड्डाण पाच हजार कोटींपर्यंत पोहोचलं. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचं म्हणजेच अनंत अंबानी यांच्या लग्नाचा थाट संपूर्ण देशाने पाहिला. हा लग्नाचा सोहळा इतका मोठा होता की, भव्यदिव्य हा शब्दही तोकडा पडेल म्हणूनच या लग्नाची चर्चा जगभरात झाली. कारण, जगातला सर्वात महागडा लग्नसोहळा अशी त्याची नोंद झाली आहे.


जगातलं सर्वात महागडं लग्न



  • अनंत अंबानी यांच्या लग्नात तब्बल 5 हजार कोटी रुपयांचा खर्च

  • ब्रिटनमध्ये प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या लग्नाला 1 हजार 361 कोटी खर्च

  • शेख हिंद बिंत बिन मकतूम आणि शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या लग्नात 1 हजार 144 कोटी खर्च


अनंत-राधिकाची डोळे विस्फारणारी लग्नपत्रिका


जगभरातील सर्वात महागडं लग्न अशी ओळख असलेल्या अनंत अंबानींच्या लग्नाची पत्रिकाही अतिशय खास होती. लग्नाच्या पत्रिकेत मंदिराची प्रतिकृती, त्यात देव-देवतांच्या सोन्याच्या मूर्ती होत्या. लग्नपत्रिकेसोबत पाहुण्यांना चांदीची आकर्षक, कोरीव पेटीही भेट देण्यात आली होती. अनंत-राधिका यांच्या लग्नाची पत्रिका ही भक्ती आणि परंपरेचा मेळ होती. पत्रिकेसोबत काश्मीरच्या कारागिरांनी हाताने बनवलेली दोरुखा पश्मिना शाल देखील होती. या एक लग्नपत्रिकेची किंमत सुमारे तीन लाख रुपये होती.


प्री-वेडिंगचाही नत्रदीपक सोहळा


जगभरात सर्वात मोठं लग्न असलेल्या या लग्नाचे अनेक सोहळे पार पडले. अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगच्या सोहळ्यात कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगचा सोहळा गुजरातच्या जामनगरला तीन दिवस चालला. प्री-वेडिंगच्या सोहळ्यालाच 1 हजार कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. प्री-वेंडिंग सोहळ्याला मार्क झुकरबर्ग, बिल गेट्ससारखे पाहुणे
निमंत्रित होते. प्री-वेडिंग सोहळ्यासाठी साडेतीनशे विमानांची वाहतूक झाली. प्री-वडिंग सोहळ्यात परफॉर्मन्ससाठी रिहानाला 74 कोटी, जस्टिन बिबरच्या परफॉर्मन्सला 83 कोटी रुपये देण्यात आले होते. इटलीत क्रुझवर झालेल्या प्री-वेडिंग सोहळ्यात जगभरातील 800 पाहुणे पोहोचले होते.


लग्नाआधीच्या सोहळ्यांवर झालेला खर्च पाहून भारतच काय पण जगभरातील नागरिकांची बोटं तोंडात गेली नसती तरच नवल. महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील बीकेसी इथं झालेल्या शानदार आणि देदिप्यमान विवाहसोहळ्याचीही चर्चा जगभरात रंगली आहे. जगाच्या काणाकोपऱ्यापासून ते भारतातील राजकीय, औद्योगिक तसेच बॉलिवूडच्याही रथी महारथींनी या सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या वऱ्हाडींनाही रीटर्न गिफ्ट म्हणून महागड्या वस्तू देण्यात आल्या. 


वऱ्हाडींनाही महागड्या भेटवस्तू


विवाह सोहळ्याला उपस्थित पाहुण्यांना महागडी घड्याळं भेट देण्यात आली. शाहरूख, सलमान, रणवीरसह अनेक पाहुण्यांना तब्बल दोन कोटी रुपयांची घड्याळ भेट देण्यात आलं. सोन्याच्या घड्याळांना हिरे-माणकांची आकर्षक सजावट आहे. लग्न सोहळ्यात खुद्द नवरदेव अनंत अंबानींच्या हातात 54 कोटींचं घड्याळ होतं.


अंबानींच्या लग्नात पंगतीची चर्चा


कोणतंही लग्न म्हटलं की, त्याच्यातील पंगतींची आणि त्यातील पदार्थांचीही रुचकर चर्चा रंगत असते. त्यामुळे, अंबानींच्या घरच्या सोहळ्यातील पंगतीही सर्वांच्याच कायम लक्षात राहतील अशाच होत्या. लग्नातील जेवणावळींसाठी जगभरातील 10 प्रसिद्ध शेफनी पदार्थ बनवले होते. जगभरातील तब्बल 2500 पदार्थांची रेलचेल या सोहळ्यात पाहायला मिळाली. मेन्यूमध्ये खास भारतीय पदार्थांसोबत जगभरातील प्रसिद्ध पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. 


आधी प्री-वेडिंगचे दिमाखदार सोहळे, त्यानंतर लग्नाचा नेत्रदिपक सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. यानंतर अनंत आणि राधिका यांच्या लग्नाचं भव्य रिसेप्शनही संपन्न झालं. म्हणूनच, भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रत्येकासाठाी हा लग्नसोहळा चर्चेचा आणि अप्रुपाचा विषय बनून गेला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Anant Radhika Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नात 'बिन बुलाये मेहमान', YouTuber सह दोन जण ताब्यात