मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने मुंबई हालवून सोडली. मोठ्या लाटा तर आल्याच शिवाय, अनेक झाडंही पडली. या चक्रीवादळाचा फटका केवळ मुंबईत नाही तर मुंबईबाहेरही बसला आहे. सिनेमांच्या सेट्सना याचा फटका बसला आहे. मुंबईबाहेर असलेल्या अजय देवगण यांच्या 'मैदान' चित्रपटाच्या सेटला या वादळाचा फटका बसलाय. याचा व्हिडीओ आता व्हायरल होतो आहे. 


अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेला 'मैदान' हा चित्रपट गेल्या लॉकडाऊनपासून रखडला आहे. बोनी कपूर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला लॉकडाऊन लागल्यानंतर ग्रहण लागलं आहे. खरंतर हा चित्रपट एका फुटबॉलपटूच्या जीवनावर बेतला आहे. सईद अब्दूल रहीम यांच्या जीवनावर हा सिनेमा बेतला आहे. चित्रपटाचं काही चित्रिकरण मुंबईजवळच्या स्टेडिअममध्ये झालं आहे. काही कोलकत्याला आहे. तर बरंच चित्रिकरण मुंबई बाहेरच्या विस्तीर्ण मैदानावर होतं आहे. यासाठी तब्बल 16 एकरची जमीन घेण्यात आली आहे. यावर सेट बांधण्यात आला होता. तौक्ते वादळाने या जागेचं बरंच नुकसान केलं. 


हे चक्रीवादळ आलं ते्व्हा सेटची काळजी घेण्यासाठी 40 पेक्षा जास्त माणसं तिथे होती. यात काही सुरक्षारक्षकांचाही समावेश होतो. त्यांनी हे वादळ आल्यानंतर सेट वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. हा सेट उद्धवस्त झाल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागला आहे. गेल्या लॉकडाऊन पासून या सिनेमाला ग्रहण लागलं आहे. फुटबॉलवर हा चित्रपट बेतला असल्याने मैदान हे त्याचं मुख्य अंग आहे. आधी लॉकडाऊन आणि आता पुढे येणारा पाऊस या सगळ्या गोष्टींमुळे निर्मात्यासमोरच्या अडचणीत वाढ झाली आहे.  


या वादळाचा फटका मुंबईतल्या काही सेट्सनाही बसला. ज्या सेटवर पत्रे होते ते पत्रे तर उडून गेलेच. पण काही ठिकाणी पडझडही झाली. 'टायगर 3' च्या सेटलाही याची झळ बसली. हा सेट फिल्मसिटीत आहेत. फिल्मसिटीत असलेल्या बाळूमामावर बेतलेल्या मालिकेच्या सेटवरचे पत्रेही उडून गेले. या सेटवर काही शेळ्या, घोडे, म्हशी आहेत. पण त्यांचा गोठा मजबूत असल्यामुळे त्यांना अपाय झाला नाही. 


महत्वाच्या बातम्या :