Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळाने मुंबईला हालवून सोडलं. वादळ ज्या दिवशी मुंबईच्या किनारपट्टीजवळ आलं तेव्हा वाऱ्याचा वेग तब्बल 120 किलोमीटर प्रती तास वेगाने वाहात होता. साहजिकच याचा परिणाम मुंबापुरीतल्या झाडांवर झाला. मुंबई आणि उपनगरातली अनेक झाडं उन्मळून पडली. अनेक झाडांच्या फांद्या पडल्या. पण एका उन्मळून पडलेल्या झाडामुळे दिया और बाती हम या मालिकेतली अभिनेत्री दीपिका सिंह गोयल चांगलीच ट्रोल झाली आहे. 


दिया और बाती हम या मालिकेत दीपिका सिंग गोयल मुख्य भूमिकेत आहेत. ती नेहमीच इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असते. तोक्ते वादळ मुंबईत येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा परिणाम जाणवला. अनेक ठिकाणी झाडं पडली होती. यात पडलेल्या झाडावर दीपिकाने फोटोशूट केलं. ते फोटो इन्स्टावर टाकल्यानंतर दीपिकाच्या या कृत्यामुळे अनेक चाहते नाराज झाले. तोक्तेने भीषण रूप धारण केलं होतं. अशावेळी त्या वादळामुळे पडलेल्या झाडावर असं फोटोशूट करणं अयोग्य असल्याचं मत अनेक तिच्या चाहत्यांनी तिच्या फोटोवर व्यक्त केलं. दीपिका या फोटोशूटमुळे ट्रोलही झाली. 


इन्स्टावर येणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहून मग मात्र दीपिकाने आपली बाजू मांडायचं ठरवलं. त्यानंतर तिने आपण फोटोशूट का केलं हेही सांगितलं. ती म्हणाली, वादळाने नुकसान झालं आहे हे खरं आहे. याच वादळाने आमच्या घरासमोरच्या झाडाची फांदी आमच्या दारात पडली. आम्ही ती सकाळी उठल्यावर बाजूला केली. त्यानंतर त्या वादळाची आठवण म्हणून एकदोन फोटो आम्ही काढले. यातून भावना दुखावण्याचा संबंध नव्हता. दीपिकाचे हे फोटो मात्र बरेच व्हायरल झाले आहेत. 


दीपिकाचे हे फोटो व्हायरल होतानाच, असं फोटो शूट करायचं असेल तर ते कसं करावं असे अनेक उपदेशही दीपिकाला देण्यात आले आहेत. आपली बाजू मांडल्यानंतर मात्र दीपिकाने या पोस्टकडे दुर्लक्ष केलं. तिने तिची पोस्ट टाकल्यानंतरही तिच्या या अशा फोटोशूटबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.