मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन हिने मुंबईतील गोरेगावमधली एका व्यावसायिकाविरुद्ध 4.14 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात, आरोपी व्यावसायिकाने अभिनेत्रीला 28 ते 30 टक्के परतावा देण्याचे आश्वासन देऊन नवीन व्यवसायाच्या माध्यमातून तिच्या फिल्म प्रॉडक्शन हाऊसचे 4.14 कोटी रुपये गुंतवले. परंतु आरोपीने रिमी सेनला ना गुंतवलेली मूळ रक्कम परत केली, ना गुंतवणुकीच्या वेळी तिला दिलेल्या वचनानुसार व्यवसायातील नफ्याची रक्कम परत केली. आता आरोपीने संपर्क तोडल्याचा आरोप रिमी सेनने केला आहे.
2019 मध्ये अंधेरीतील एका जिममध्ये ती आरोपी रौनक जतिन व्यासला भेटल्यापासून रिमी सेनच्या फसवणुकीला सुरुवात झाली. यादरम्यान आरोपीने 40 वर्षीय रिमी सेनला त्याच्या फॅमिली बिझनेस फर्म फोमिंगो बेव्हरेजेसच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याची ऑफर दिली. "मैत्री वाढल्यानंतर आरोपीने अभिनेत्रीला नवीन व्यवसायात गुंतवणूक केल्यास 28 ते 30 टक्के परतावा देण्याची ऑफर दिली," अशी माहिती पोलिसांनी दिली.
त्यानंतर अभिनेत्रीने तिच्या बिझनेस पार्टनरसोबत चर्चा करुन आरोपी व्यासच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, "त्यावेळी आरोपीने अभिनेत्रीला सिक्युरिटी म्हणून 3.50 कोटी रुपयांचा धनादेशही दिला होता." फेब्रुवारी ते जुलै 2019 दरम्यान, अभिनेत्री रिमी सेनने व्यासच्या फर्ममध्ये एकूण एक कोटी रुपये ट्रान्सफर केले. पैसे मिळाल्यानंतर आरोपी व्यासने अभिनेत्रीला तिच्या भविष्यातील गुंतवणुकीवर 40 टक्के परतावा देण्याचे वचन दिलं. यानंतर, अभिनेत्रीने ऑक्टोबर 2019 ते नोव्हेंबर 2020 दरम्यान आणखी 3.14 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
दिलेल्या मुदतीत परतावा न मिळाल्याने अभिनेत्रीने आरोपी व्यासकडे यासंदर्भात चौकशी केली. मात्र, अभिनेत्रीने विचारणा केली असता आरोपी कायमच टाळाटाळ करत असे. मार्च 2020 मध्ये रिमी सेनने आरोपी व्यासला नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं, त्यानंतर आरोपीने तिच्या फर्मच्या बँक खात्यात 3 लाख रुपये ट्रान्सफर केले. नंतर त्याने आणखी पैसे दिले नाहीत.
आरोपीच्या वर्तनाने निराश झाल्यानंर अभिनेत्रीने अखेरीस 3.50 कोटी रुपयांचा चेक जमा केला. (व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी सिक्युरिटी म्हणून आरोपीने अभिनेत्रीला 3.50 कोटी रुपयांचा धनादेश दिला होता) परंतु बँक खातं बंद असल्याचं आढळून आलं. त्यानंतर रिमी सेनला समजलं की व्यासने कधीही कोणताही व्यवसाय सुरु केला नाही, त्यानंतर तिने याची माहिती पोलिसांना दिली.
अभिनेत्री रिमी सेनच्या तक्रारीनुसार, खार पोलिसांनी मंगळवारी (29 मार्च) व्यासवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी व्यासशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचे दोन्ही मोबाईल नंबरही बंद आहेत. याप्रकरणा पुढील तपास खार पोलीस करत आहेत.