मुंबई : बॉलिवूड कलाकारांसाठी हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीकोनातून काहीसं निराशाजनक ठरलं आहे. सोनाली बेंद्रे, इरफान खान आणि आयुषमानची पत्नी ताहिरा कश्यप यांच्यानंतर बॉलिवूडमधील आणखी एका अभिनेत्रीला कर्करोगाचं निदान झालं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी ब्यूटीक्वीन नफीसा अली यांच्या कॅन्सरने तिसरी स्टेज गाठली आहे.

नफीसा अली यांनी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहून आपल्या आजाराविषयी माहिती दिली आहे. नफीसा यांना पेरिटोनिअल आणि ओव्हरिअन कॅन्सरचं निदान झालं आहे.



काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत नफीसा यांनी फोटो शेअर केला. 'नुकतीच माझ्या लाडक्या मैत्रिणीची भेट घेतली. तिने मला कर्करोगाशी लढण्यास बळ आणि शुभेच्छा दिल्या' असं नफीसा यांनी म्हटलं आहे.


नफीसा अली यांनी कुटुंबीयांसोबत दुसरा फोटो शेअर केला आहे. यामध्ये पती निवृत्त कर्नल आर एस सोधी, मुलगा अजित आणि मुली पिया-अर्माना दिसत आहेत. 'माझं कुटुंब आणि बलस्थान' असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.


नफीसा अली यांनी जुनून, मेजर साब, बेवफा, लाईफ इन अ... मेट्रो, यमला पगला दिवाना यासारख्या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. संजय दत्तसोबत 'साहेब बिवी और गँगस्टर 3' या चित्रपटात त्या अखेरच्या झळकल्या. 2009 लोकसभा निवडणुकीत त्या समाजवादी पक्षाच्या तिकीटावर लढल्या होत्या. पराभवानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

याआधी, अभिनेत्री सोनाली बेंद्रेला मेटॅस्टिक कॅन्सरचं निदान झालं होतं. तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. तर मार्च महिन्यात अभिनेता इरफान खानला न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर झाला असून तोही लंडनमध्ये उपचार घेत होता.