मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातून आरोपी शेराला अटक केली आहे. योगायोग म्हणजे सलमानच्या खास मर्जीतील अंगरक्षकाचं नावही शेरा आहे. त्यामुळे सुरुवातीला शेराच्या अटकेचं वृत्त पसरल्यानंतर चाहत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं.
सलमान खानचा चाहतावर्ग फक्त भारतच नाही, तर जगभरात पसरला आहे. सलमानचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या 'गॅलक्सी' या राहत्या घराबाहेर दिवस-रात्र तासतासभर रांगा लावून बसतात. सलमानला जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी शेराही अनेकवेळा गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सलमानच्या वाटेकडे डोळे लावून बसत होता. मात्र सलमानची भेट घेण्याची संधी त्याला मिळाली नाही.
सलमानची भेट न झाल्याने फुरंगटलेल्या शेराने सलमानच्या कर्मचाऱ्याला फोन केला. सलमानशी बोलू न दिल्यास सलमानचा जीव घेईन, अशी धमकी शेराने दिल्याचा आरोप आहे. सलमानच्या पीएने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून आरोपीला बेड्या ठोकल्या. मुंबईतील वांद्रे कोर्टात त्याची हजेरी लावण्यात आली.
सलमानशी लग्न करण्यासाठी काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील 24 वर्षीय मनोरुग्ण तरुणी घरातून पळाली आणि तिने मुंबई गाठली. पोलिसांनी कुसुमच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून तिची रवानगी केली.
काही महिन्यांपूर्वीच सलमानच्या घरी एक तरुणी तीक्ष्ण हत्यार घेऊन घुसली. इतकंच नाही तर तिने आत्महत्येची धमकीही दिली. तिने सलमान खानच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि सलमान माझा नवरा आहे, असं ओरडू लागली. काय गोंधळ सुरु आहे हे पाहण्यासाठी सलमानचा आचारी बाहेर आला, पण तोपर्यंत तरुणी गच्चीवर पोहोचली होती.
प्रेम रतन धन पायो सिनेमाचं तिकीट न मिळाल्याने सलमान खानच्या एका चाहत्याने आत्महत्या केली होती. चित्रपटाचं फर्स्ट डे फर्स्ट शोचं तिकीट न मिळाल्याने निराश झाल्याने चाहत्याने मध्य प्रदेशातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, शेराला अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Nov 2018 09:08 AM (IST)
सलमानची भेट न झाल्याने फुरंगटलेल्या त्याच्या चाहत्याने सलमानच्या कर्मचाऱ्याला फोन केला. सलमानशी बोलू न दिल्यास सलमानचा जीव घेईन, अशी धमकी आरोपी शेराने दिल्याचा आरोप आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -