Bollywood Actor Rejected Karan Johar Offer: बॉलिवूड (Bollywood) म्हणजे, ग्लॅमरचं मायाजाल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अनेकजण इथे नशीब आजमावण्यासाठी येतात. पण, काहींचं नशीबाचं नाणं चमकतं, पण काहींचं नाणं खोटं ठरतं. असंच काहीसं झालंय, एका बॉलिवूड अभिनेत्याचं. त्याच्या पाठीशी कुणीच बॉलिवूडकर नव्हता. तो स्वतः बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी आला, त्यानं पाहिलं आणि काही काळातच आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यानं सर्वांना आपलंसं केलं अन् बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. त्या अभिनेत्याचं नाव म्हणजे, सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi). 


सिद्धांत चतुर्वेदीनं (Actor Siddhant Chaturvedi) 'इनसाइड एज' (Inside Edge) वेब सीरिज आणि 'खो गये हम कहां', 'गली बॉय' (Gully Boy) आणि 'गहराइयां' (Gehraiyaan) सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयानं लोकांची मनं जिंकली आणि तो स्टार बनला. 29 एप्रिल 1993 रोजी उत्तर प्रदेशातील बलिया येथे जन्मलेल्या सिद्धांतनं स्वतःच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक खास स्थान निर्माण केलं. बॉलिवूडमध्ये घरचं कुणी नसून, तसेच कुणा दिग्गजाचा डोक्यावर हात नसूनही तो आज दिग्गज स्टार किड्सना टक्कर देतोय. 


बॉलिवूडमध्ये जाऊन करण जोहरच्या बिग बजेट मूव्ही करणं अनेकांची स्वप्न. कित्येक बॉलिवूड स्टार्स तर अजुनही करण जोहरच्या ऑफरची आतुरतेनं वाट पाहत आहेत. पण, करिअर सुरु होण्यापूर्वीच सिद्धांतला करण जोहरची ऑफर मिळाली, पण ती त्यानं नाकारली. महत्त्वाची बाब म्हणजे, सिद्धांतनं एकदा नाहीतर तब्बल दोनदा करण जोहरची ऑफर नाकारली. यानंतर त्यानं कठोर परिश्रम घेतले आणि स्वतःच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्टार बनला. 


सिद्धांत फक्त 5 वर्षांचा असताना त्याच्या कुटुंबासह तो मुंबईत स्थायिक झाला. मिठीबाई कॉलेजमध्ये शिकत असताना त्यानं नाटकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली. लोकप्रिय फ्रेश फेस स्पर्धा जिंकल्यानंतर सिद्धांतनं चित्रपट ऑडिशनसाठी त्याची अंतिम सीए परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. त्यानं करण जोहरच्या अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अभिनीत ब्रह्मास्त्र चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं, पण वडिलांच्या सल्ल्यानंतर त्यानं ही संधी नाकारली. त्याला करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्ससोबत तीन चित्रपटांचा करारही देण्यात आला होता, जो सिद्धांतनं नाकारला.






करण जोहरच्या ऑफर्स का नाकारल्या? 


गेल्या वर्षी, ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत, सिद्धांतनं त्याच्या वडिलांनी त्याला ब्रह्मास्त्र साईन न करण्याचा सल्ला का दिला? ते सांगितलं. सिद्धांतनं बोलताना सांगितलं की, "ते अजूनही स्क्रिप्ट लिहित होते आणि मी उत्साहित होतो. मीही हे करू शकलो असतो, पण माझ्या वडिलांनी मला ते करू दिलं नाही. तो म्हणाला तू यापेक्षा चांगला आहेस. ते अजूनही मला पुढे ढकलतात. धर्मासोबत मला तीन चित्रपटांचा करार मिळणार याचा मला आनंद होता. मी अयानला भेटलो, ज्यानं मला ब्रह्मास्त्र बाबतचा त्याचा प्लान मला दाखवला. तोपर्यंत मी फक्त काही जाहिराती केल्या होत्या, त्यामुळे मी काहीच नव्हतो. मी माझ्या वडिलांना सांगितलं की, या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आहेत आणि अमिताभ बच्चनसुद्धा.  त्यांनी मला विचारलं, "मग तुला कोण बघणार?", ते पुढे म्हणाले की, "बाळा, मला नाही वाटत तू ही ऑफर स्विकारावीस... तुझ्याकडे स्क्रिप्ट आहे? तू यासाठी ऑडिशन दिलेलंस? जर तुला हेच माहिती नाही की, तू त्या फिल्ममध्ये काय करणार आहे, तर मग स्वतःचं नशीब का विकतोयस?"


चित्रपट नाकारल्यामुळे धर्मा प्रोडक्शन्समध्ये 'ब्लॅक लिस्ट'


सिद्धांत पुढे म्हणाला की, "अनेक चित्रपट नाकारल्यानंतर त्याला बॉलिवूडमधून ब्लॅकलिस्ट करण्यात आलं. अडचण अशी नव्हती की, मला ऑफर नव्हत्या, पण मला माहीत होतं की, मला फक्त हिरो व्हायचं आहे, लीड रोल करायचा आहे. मी अभिनय करेन, मी माझ्या कलेवर खूप मेहनत घेतली आहे, पण मला खूप धमाल करायची होती. मला अनेक चित्रपटांसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलं होतं, पण मी ते नाकारले, कारण मला वाटत नाही की, ते माझ्या विचारांना न्याय देऊ शकतील. मला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आलं, कारण लोकांना वाटलं, "ही व्यक्ती कोण आहे, जी नाही म्हणतेय? मी साईड रोल करायला नकार दिला, कारण मला माहीत होतं की, माझ्यात क्षमता आहे. मला स्वतःला कमी लेखायचं नव्हतं."


250 कोटींच्या फिल्ममधून केला डेब्यू 


2019 मध्ये, सिद्धांतनं झोया अख्तरच्या 'गली बॉय' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ज्यामध्ये त्यानं रॅपर एमसी शेरची भूमिका साकारली होती. त्याच्या दमदार अभिनयामुळे त्याला अनेक पुरस्कार मिळाले आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. यासोबतच, सिद्धांतनं सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठी झी सिने पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठी स्क्रीन पुरस्कार देखील जिंकला. भारतीय स्ट्रीट रॅपर्स डिव्हाईन आणि नेझी यांच्या जीवनावर आधारित 2019 च्या म्युझिकल ड्रामानं जगभरात अंदाजे 250 कोटी रुपये कमावले होते. 


दरम्यान, करण जोहरसोबत ब्रह्मास्त्रमध्ये काम करण्यास नकार दिल्यानंतर, सिद्धांत पुढे जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्स निर्मित 'धडक 2' या रोमँटिक ड्रामामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सिद्धांतसोबत तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2018 मध्ये आलेल्या ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांच्या 'धडक' या चित्रपटाचा सिक्वेल आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Chhaava Movie Song Writer Kshitij Patwardhan: 'छावा'मधल्या 'आया रे तुफान'साठी मराठमोळ्या गायकाचं 'शब्दरुपी योगदान'; म्हणाला...