Bollywood Actor Govinda Gun Misfire: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा (Govinda) यांच्याकडून चुकून बंदुकीची गोळी (Gun Fire) झाडली गेल्याची माहिती समोर आली आहे. स्वत:च्या बंदुकीतून गोळी सुटल्यामुळे गोविंदा जखमी झाला आहे. ही गोळी गोविंदाच्या पायात शिरली. त्यामुळे आता गोविंदा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्याकडून मिसफायर झाल्याची माहिती मिळत आहे. स्वतःच्याच बंदुकीतून सुटलेली गोळी गोविंदाला लागली, त्यामुळे गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत गोविंदा यांच्या पायाला गोळी लागल्याची माहिती मिळत आहे. दुर्घटनेनंतर गोविंदा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. क्रिटी केअर रुग्णालयात गोविंदा यांना दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया देखील पार पडल्याची माहिती मिळत आहे. गोविंदा यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेनंतर गोविंदा यांच्याशी अद्याप कोणतिही चर्चा झालेली नाही, तसेच, घरात ते एकटेच होते. त्यामुळे नेमकं त्यावेळी काय झालं हे अद्याप समजू शकलं नाही. पोलिसांनीही अद्याप जबाब नोंदवलेला नाही.
नेमकं काय घडलं?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सकाळी काही कामानिमित्त घराबाहेर पडताना चुकून गोविंदा यांच्याकडून मिसफायर झाली आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गोविंदा यांच्याकडे परवानाधारक पिस्तुल आहे. ते सकाळी बाहेर जाण्यासाठी आपल्या गाडीने निघाले होते. त्यावेळी गाडीत बसताना गोविंदा यांच्याकडील पिस्तुलमधून चुकून गोळी सुटली आणि ती थेट पायात शिरली. गोविंदा यांच्यावर सध्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. पोलीस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत.
गोविंदा यांना गोळी नेमकी कशी लागली?
अभिनेता गोविंदा यांना स्वतःच्याच बंदुकीतून निघालेली गोळी पायाला लागल्यामुळे मोठी दुखापत झाली आहे. पण, त्यांच्याकडून मिसफायर झालं कसं? नेमकं काय घडलं? त्यांना गोळी कशी लागली? असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत. याबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. सकाळी कामानिमित्त बाहेर जाताना घाईगडबडीत गोविंदा यांच्या बंदुकीतून गोळी निघाली आणि ती थेट त्यांच्या पायात घुसल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे, पहाटेच्या वेळी जुहू येथील राहत्या घरात स्वतःची बंदूक साफ करत असताना त्यांच्याकडून मिसफायर झालं आणि बंदुकीची गोळी थेट त्यांच्या पायाच घुसल्याची माहिती मिळत आहे.
पाहा व्हिडीओ : Govinda : अभिनेता गोविंदाकडून मिसफायर, गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू