Rajinikanth Admitted in Chennai Hospital: ज्येष्ठ अभिनेते आणि सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना सोमवारी रात्री उशिरा चेन्नईतील (Chennai) एका खासगी रुग्णालयात (Apollo Greams Lane Hospital) दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रकृती अस्वास्थामुळे सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुत्रांच्या वतीनं देण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 73 वर्षीय रजनीकांत यांना मंगळवारी एका इलेक्टिव प्रोसिजरमधून जावं लागू शकतं. मात्र, रजनीकांत यांच्या कुटुंबीयांकडून किंवा रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
चेन्नई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांना चेन्नईतील अपोलो ग्रिम्स रोड रुग्णालयात नेण्यात आलं. पोटात तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित सुपरस्टार रजनीकांत
इंडस्ट्रीतील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक, रजनीकांत. भारत सरकारनं त्यांना 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2016 मध्ये पद्मविभूषण देऊन गौरविलं. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेसाठी शेवेलियर शिवाजी गणेशन पुरस्कार मिळाला आहे. 45 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2014 मध्ये, त्यांना वर्षातील भारतीय चित्रपट व्यक्तिमत्वाचा शताब्दी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 च्या 50 व्या आवृत्तीत त्यांना आयकॉन ऑफ ग्लोबल ज्युबिली पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. एमजी रामचंद्रन यांच्यानंतर तामिळ सिनेमाच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा अभिनेता म्हणजे, रजनीकांत असं सांगितलं जातं. 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.