अमिताभ बच्चन भारतीय सिनेमाची दंतकथा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज जनमानसात बच्चन ही फ्रेज बनली आहे. जे भल्या भल्यांना जमत नाही ते बच्चन यांनी आपल्या दुसऱ्या इनिंगमध्ये करून दाखवलं. केवळ अभिनय नव्हे, तर सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवतानाच त्यांनी टीव्हीसृष्टीही गाजवली. त्यांनी जे ठरवलं ते केलं. त्याचाच एक अभंग हिस्सा आहे त्यांचा ब्लॉग. बच्चन बोल. आज १७ एप्रिलला त्यांच्या ब्लॉगला तब्बल १२ वर्षं पूर्ण झाली.


खुद्द अमिताभ बच्चन यांनीच ही माहीती ब्लॉगवरून त्यांच्या चाहत्यांना दिली. अर्थात इतर सोशल साइटवरही त्यांनी नंतर ही माहीती दिलीच. १२ वर्षं म्हणजे तब्बल ४ हजार ४२४ दिवस. अमिताभ बच्चन ब्लॉग लिखाण करतायत. रोजनिशीच ती. दिवसभरात काय केलं.. कुणाचे वाढदिवस होते.. कुठले व्हिडिओ पाहिले हे सगळं ते आपल्या ब्लॉगमध्ये लिहित आले आहेत. आपल्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल तर ते बोलतातच शिवाय, लिहिता लिहिता त्यांना काय वाटतं.. स्वत:बद्दल.. कुटुंबाबद्दल.. तेही ते लिहित आले आहेत. अगदी उदाहरण द्यायचं तर.. अलिकडच्या काळात ब्लॉग लिहिता लिहिता त्यांची धुसर झालेली दृष्टीही त्यांनी यात लिहिली. आपल्याला दोन प्रतिमा दिसू लागल्या आहेत.. आता भविष्यात आपल्याला अंधत्व येईल की काय हे त्यांनी आपल्या ब्लॉगमध्येच लिहिलं. अलिकडच्या काळात लॉकडाऊनमध्ये झालेलं डॉल्फिनचं दर्शन.. लोकांना केली जाणारी मदत यासगळ्याचा उल्लेख ते आपल्या ब्लॉगमध्ये करतात.


काही महिन्यांपूर्वी आपल्याला अभिनय करण्याचा आता कंटाळा आला आहे असं सांगूनही त्यांनी खळबळ उडवून दिली होती. फिल्मसिटीमध्ये झालेला गोळीबार असो.. शुटिंग्जचे काही किस्से असोत.. गाठीभेटी असोत .. अगदी डायनिंग टेबलवर काय चर्चा होतात हेही बच्चन साहेबांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं. अर्थात त्यांना काय बोलायंच.. किती बोलायचं.. आणि कसं बोलायचं हे उत्तम माहित असल्यामुळे लोकांना जेवढं सांगायचं आहे तेवढंच ते बोलत आले आहेत.


त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावायची संधी म्हणून चाहते या ब्लॉगकडे पाहतात. बच्चन यांच्या लिखाणातून काहीतरी बातमी सुटेल म्हणून अनेक पत्रकार त्यांच्या ब्लॉगकडे डोळे लावून बसलेले असतात. आणि मग त्यांनी लिहिलेल्या एखाद्या वाक्याची बातमी होऊन खळबळ उडते. अर्थात लिहिताना बच्चन यांनी ते एकच वाक्य लिहिलेलं नसतं. पण बच्चन यांचं नाव पुन्हा घुमतं.


विशेष दाद देण्यासारखी बाब अशी की साधारण १२ वर्षांपूर्वी बच्चन यांनी एक गोष्ट ठरवली. आज त्यांचं वय ७७ आहे. म्हणजे, ६५  व्या वर्षी त्यांनी ठरवलं की आता मी रोज ब्लॉग लिहिणार. अनेकांना खोटं वाटेल त्यानंतर रोज.. म्हणजे रोज बच्चन ब्लॉग लिहितायत. कघी छोटा. कधी मोठा.. पण त्यांनी हे व्रत सोडलेलं नाही. शुटिंग असो.. किंवा प्रवास किंवा हॉस्पिटल चेक.. त्यांनी रोज रात्री रोजनिशी लिहिलेली आहेच. ट्विटर, इन्स्टा, फेसबुक, जाहिराती, सिनेमे, टीव्ही आदी अनेक गोष्टीत बिझी असतानाही बच्चन यांनी आपलं ब्लॉग लिहिणं थांबवलेलं नाही.


बघता बघता १२ वर्षं झाली. एखादी गोष्ट ठरवली की ती वेळापत्रकानुसार चिकाटीने करायची सवय त्यांनी स्वत:ला लावून घेतली आहे. म्हणून बच्चन बच्चन आहेत. वयाची साठीत दिवाळखोर निघालेल्या बच्चन यांनी पुन्हा एकदा गरूडझेप घेतली. कधी नव्हे इतके ते उंच झेपावले. आता त्यांनी इतकं काम करून ठेवलं आहे की आज काम बंद केलं तरी बच्चन यांची झेप आकाशाच्या दिशेनेच जाणारी असेल. त्यावेळी त्यांनी स्वत:ला शिस्तबद्धही बनवलं. ठरलेल्या गोष्टी ठरल्यानुसार करायच्या अगदी मन लावून हे त्यांनी ठरवलं आणि ते केलं.


त्यांच्या ब्लॉगची १२ वर्षात आता जवळपास साडेचार हजार पानं झाली आहेत. बागबानमधल्या राज मल्होत्राचं पुस्तक जसं पुढे विक्रमी किमतीला विकलं जातं.. तसंच या ब्लॉगचं उद्या पुस्तक निघालं तर नवल वाटायला नको.