मुंबई : भारतात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. हा वाढता आकडा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात 3 मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली आहे. मात्र तरीही काही लोक अजूनही घराबाहेर पडून स्वत:चा आणि सोबतच इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. अशा लोकांवर अभिनेता सलमान खान चांगलाच भडकला आहे. सलमानने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांना लोकांना समज दिली असून लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर आपला संताप व्यक्त केला आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओत सलमान म्हणतोय की, कोरोनाच्या या महामारीत डॉक्टर व नर्सेस तुमचे प्राण वाचवत आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर दगडफेक करताय. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णालयातून पळून जात आहेत. कोणत्या दिशेला पळताय तुम्ही? मृत्यूकडे की जीवनाकडे? जर हे डॉक्टर तुमचा उपचार करत नसते आणि पोलीस रस्त्यांवर सुरक्षेसाठी नसते तर काही लोक ज्यांना असं वाटतं की आम्हाला कोरोना होणार नाही ते देशाच्या अनेक लोकांसोबत आपलेही प्राण गमावून बसतील, असं सलमानने म्हटलं आहे.

सलमान म्हणाला की, ज्यांच्याकडे दोन वेळचं पोट भरायला जेवण नाहीये, मुलांचं पोट भरण्यासाठी अन्न नाही, त्यांना मी सलाम करतो. कारण त्यांनाही हे ठाऊक आहे की कुटुंबीयांना गमावण्यापेक्षा ही वेळ निघून जाणं योग्य आहे. देशात खूप चांगलं काम होतंय. देशाचे नागरिक एकमेकांशी जोडले गेले आहेत. मात्र काही जोकर्समुळे कोरोना पसरतोय. तुम्ही नीट वागला असता तर आतापर्यंत आपण सर्वजण पुन्हा कामावर रुजू झालो असतो. चीनमधून सुरू झालेला कोरोना आता तिथे नियंत्रणातसुद्धा आला आहे. मात्र आपल्याकडे काही लोकांमुळे संपूर्ण देशवासियांना घरात बसावं लागत आहे, असं सलमान या व्हिडीओत म्हणाला.

तुम्ही खूप ताकदवान आहात हे मानतो. पण तुम्ही इतके साहसी व ताकदवान आहात की तुमच्या कुटुंबीयांच्या मृतदेहाला खांदा देऊ शकाल? इतकी हिंमत आहे का? प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. याच्याही दोन बाजू आहेत. एकतर सर्वजण राहतील किंवा मग कोणीच नाही राहणार. आता तुम्ही ठरवा,  असंही तो म्हणाला.

काय म्हणाला सलमान