मुंबई : कधी खाष्ट सासू तर कधी कठोर आई, त्या जेव्हा पडद्यावर यायच्या तेव्हा अनेकांच्या तोंडून शिव्याशाप आल्याशिवाय राहायच्या नाहीत. त्यांचा अभिनय पाहून विश्वास ठेवणं कठीण व्हायचं की, त्या अभिनय करतात की सगळं खरंखुरं घडत आहे. ही अभिनेत्री म्हणजे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या ललिता पवार.


ललिता पवार यांचं निधन होऊन बरीच वर्ष लोटली, पण आज लहान मुलांनाही त्यांचं नाव माहित आहे. त्यांनी खाष्ट सासूच्या अशा व्यक्तिरेखा साकारल्या, ज्या पाहून लोक क्रूर सासूचं उदाहरण देण्यासाठीही त्यांचं नाव घेतात. फिल्मी पडद्यावर खाष्ट सासू अशीच त्यांची ओळख होती. त्यांनी काही सॉफ्ट रोलही केले, पण त्यांना खरी ओळख आणि लोकप्रियता निगेटिव्ह भूमिकांमुळे मिळाली.

ललिता पवार यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दलच्या माहिती नसलेल्या गोष्टींचा उलगडा करणार आहोत.

एका घटनेने ललिता खलनायिका बनवलं!


पडद्यावर कठोर दिसणाऱ्या ललिता पवार खऱ्या आयुष्यात मात्र वेगळ्या होत्या. ललिता पवार एकेकाळी बॉलिवूडमध्ये हिरोईन बनण्याचं स्वप्न बाळगून आल्या होता. पण एका घटनेने त्यांना खलनायिका बनवलं.

पहिल्या चित्रपटानंतर ललिता पवार यांचं मानधन एवढं वाढलं की, अभिनयासोबत त्या चित्रपटांची निर्मितीही करु लागल्या. ललिता यांची सिनेकारकीर्द शानदार सुरु होती. पण त्यावेळी त्यांच्यासोबत अशी घटना घडली की त्यांचं आयुष्यच बदललं.

1942 मध्ये आलेल्या 'जंग-ए-आझादी' या सिनेमाच्या सेटवर एका शूटिंगदरम्यान, भगवान दादा यांना ललिता पवार यांना थोबाडीत मारायची होती. या सीनदरम्यान झालेल्या घटनेने त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली. यामुळे त्याचं हिरोईन बनण्याचं स्वप्न कायमचं तुटलं.

...आणि डावा डोळा गमावला


भगवान दादा यांनी ललिता यांना एवढ्या जोरात थोबाडीत मारली की त्या खाली कोसळल्या आणि त्यांच्या कानातून रक्त येऊ लागलं. यानंतर त्यांच्या शरीराच्या डाव्या भागात लकवा गेला. ललिता पवार यांच्यावर तीन वर्ष उपचार सुरु होते. त्या बऱ्या तर झाल्या पण लकव्यामुळे त्यांना डावा डोळा गमवावा लागला. इतकंच नाही तर त्यांचा चेहराही कायमचा बिघडला.

डोळा खराब झाल्याने ललिता पवार यांचं हिरोईन बनण्याचं स्वप्न तुटलं. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांना हिरोईनची भूमिका मिळाली नाही. मात्र इथूनच हिंदी सिनेमातील सर्वात खाष्ट सासूचा जन्म झाला. ललिता यांनी आपल्या कारकीर्दीत जवळपास 700 चित्रपटांमध्ये काम केलं.



अभिनेत्रीच नाही तर उत्कृष्ट गायिकाही
खरंतर फार कमी लोकांना माहित असेल की, ललिता पवार उत्कृष्ट गायिकाही होत्या. 1935 मधील 'हिम्मत ए मर्दां' सिनेमातील त्यांनी गायलेलं ‘नील आभा में प्यारा गुलाब रहे, मेरे दिल में प्यारा गुलाब रहे’ हे गाणं फारच लोकप्रिय झालं होतं.

मालिकेतही काम
ललिता पवार यांनी रामानंद सागर यांच्या रामायण या पौराणिक मालिकेत मंथराची भूमिका साकारली होती. वयाच्या 32 व्या वर्षीच त्या चरित्र भूमिका साकारायला लागल्या.



नवव्या वर्षी कारकीर्दीची सुरुवात
18 रुपयांच्या मासिक पगारावर ललिता यांनी बाल कलाकार म्हणून मूकपटात काम केलं होतं. 1927 मध्ये आलेल्या या मूकपटाचं नाव 'पतित उद्धार' होतं.

'श्री 420', 'अनाड़ी', 'हम दोनों', 'आनंद', 'नसीब', 'दुसरी सीता', 'काली घटा' यांसारख्या शेकडो सिनेमात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. 1959 मध्ये 'अनाड़ी' चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.



खासगी आयुष्य
ललिता पवार यांचा जन्म 18 एप्रिल 1916 रोजी नाशिकच्या सुखवस्तू कुटुंबात झाला होता. परंतु त्यांचं जन्मस्थळ इंदूर असल्याचं म्हटलं जातं. त्यांचे वडील लक्ष्मणराव सगुण व्यापारी होते. ललिता पवार यांनी गणपतराव पवार यांच्यासोबत लग्न केलं होतं. पण काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर त्यांनी निर्माता राजप्रकाश गुप्‍ता यांच्याशी लग्न केलं.

लकव्याशी लढल्या पण कॅन्सरशी हरल्या!
1990 मध्ये ललिता पवार यांना जबड्याचा कॅन्सर झाला. यानंतर उपचारांसाठी त्या पुण्याला गेल्या. पण कॅन्सरमुळे त्याचं वजनच कमी झालं नाही तर स्मृतीभ्रंशही झाला होता. 24 फेब्रुवारी 1998 रोजी ह्या 'खाष्ट सासू'चं निधन झालं.


दु:खद अंत
ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट केले. पण आयुष्याच्या अखेरच्या काळात त्या एकट्या पडल्या होत्या. पुण्यातील 'आरोही' या आपल्या बंगल्यात त्या राहत होत्या. त्यांचे पती राजप्रकाश रुग्णालायत होते. तर मुलगा कुटुंबासोबत मुंबईत होता. त्यानंतर ललिता पवार यांच्या मृत्यूची बातमी तीन दिवसांनंतर समजली. मुलाने फोन केल्यावर कोणीही न उचलल्याने संशय वाढला. घराचा दरवाजा तोडल्यानंतर पोलिसांना त्यांचा मृतदेह सापडला.