Transgender characters in movies: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिने नुकतेच तिच्या आगामी 'ताली' (Taali) चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. या चित्रपटात सुष्मिता एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सुष्मिता टाळी वाजवताना दिसत असून तिने लिहिले की, ‘मी टाळी वाजणार नाही, तर वाजवायला लावणार’. सुष्मिता ट्रान्सजेंडर गौरी सावंत यांची भूमिका साकारत आहे. सुष्मिताला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. पण, केवळ सुष्मिताच नाही तर तिच्यापूर्वीही अनेक अभिनेत्रींनी आणि अभिनेत्यांनी पडद्यावर ट्रान्सजेंडरच्या भूमिका साकारल्या आहेत आणि आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
आशुतोष राणा (Ashutosh Rana)
शबनम मौसी या पहिल्या अशा तृतीयपंथी आहेत, ज्यांनी निवडणूक लढवली आणि ती जिंकण्यात यश देखील मिळवले. शबनम मौसीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात अभिनेते आशुतोष राणा मुख्य भूमिकेत झळकले होते. ‘शबनम मौसी’ हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता.
वाणी कपूर (Vani Kapoor)
बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर हिने ‘चंदीगड करे आशिकी’ या चित्रपटात ट्रान्सजेंडर महिलेची भूमिका साकारली होती. वाणीने ही व्यक्तिरेखा खूप छान साकारली आहे. सुरुवातीला हे पात्र साकारताना वाणी घाबरली होती. ट्रान्सजेंडर समुदाय मला या व्यक्तिरेखेत स्वीकारेल की नाही याची मला भीती वाटत होती, असे देखील तिने एका मुलाखतीत म्हटले होते.
रुबिना दिलैक (Rubina Dilaik)
पहिल्यांदाच एका अभिनेत्रीने टीव्हीवर ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली, ती म्हणजे रुबिना दिलैक. रुबिनाने ‘शक्ती अस्तित्व के एहसास की’ या मालिकेमध्ये ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेतील रुबिनाला चांगलीच पसंती मिळाली होती.
सदाशिव अमरापूरकर (Sadashiv Amrapurkar)
महेश भट्ट दिग्दर्शित ‘सडक’ हा चित्रपट 1991मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री पूजा भट्ट मुख्य भूमिकेत झळकले होते. पण, या चित्रपटात दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी साकारलेली तृतीयपंथी भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. या भूमिकेसाठीसाठी सदाशिव अमरापूरकर यांना सर्वोत्कृष्ट नकारात्मक पात्राचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar)
2013मध्ये रिलीज झालेल्या ‘रज्जो’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणी अभिनेता पारस अरोरा मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटात अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास पाटील यांनी केले होते. ‘रज्जो’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. मात्र, यातील महेश मांजरेकर यांच्या भूमिकेचे कौतुक झाले.
शरद केळकर (Sharad Kelkar)
अभिनेता शरद केळकर याने ‘लक्ष्मी’ या चित्रपटात तृतीयपंथी ‘लक्ष्मी’ हे पात्र साकारले होते. ‘लक्ष्मी’ या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होते. मात्र, या चित्रपटातील शरद केळकरची भूमिका अधिक भाव खाऊन गेली.
हेही वाचा :
Sushmita Sen: सुष्मिता सेन साकारणार गौरी सावंत यांची भूमिका; शेअर केला 'ताली' मधील लूक