Avadhoot Gupte : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बीकेसीत तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) शिवाजी पार्कात नुकताच मेळावा रंगला. आरोप, प्रत्यारोप, टोलेबाजीमुळे दोन्ही मेळावे प्रचंड रंगले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानं शिवसेनेचं नवं गाणं प्रदर्शित केलं. लोकप्रिय गायक अवधूत गुप्तेने (Avadhoot Gupte) हे गाणं शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात गायलं. त्यामुळे गायक शिंदे गटात सामील झाल्याच्या चर्चा रंगल्या. अखेर अवधूतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
अवधूत गुप्तेने लिहिलं आहे," रसिक मायबाप, बीकेसीवर दरऱ्यानिमित्त झालेल्या मेळाव्यात मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंच्या आमंत्रणानुसार 'एक गायक म्हणून' दोन गाणी सादर केली. या पार्श्वभूमीवर मी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या".
अवधूत पुढे म्हणाला,"माझ्याकडे अद्याप कोणत्याही पक्षाचं साधं प्राथमिक सदस्यत्व पण नाही. तसेच मी कोणत्याही पक्षात किंवा गटात प्रवेश केलेला नाही. तुम्ही माझा प्रेक्षकवर्ग, चाहते, फॉलोअर्स हे माझे मायबाप आहात. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीचं स्पष्टीकरण देणं हे मी माझं उत्तरदायित्व समजतो. मी याआधीही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरुन माझी कला सादर केल्याचे तुम्ही जाणताच...माझ्या लेखी हा विषय इथेच संपला!".
अवधूत गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेक कार्यक्रमात दिसून आला आहे. त्यामुळे त्याच्या राजकारणातील प्रवेशावर चर्चा रंगल्या. अवधूतसह शिंदे यांच्या मेळाव्याला नंदेश उमप, स्वप्निल बांदोडकरसह अनेक गायकांनी हजेरी लावली होती.
संबंधित बातम्या