Bappi Lahiri : 'गोल्डन मॅन', 'डिस्को किंग' अशी ओळख असलेले ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांची आज जयंती आहे. निधनानंतरचा हा त्यांचा पहिलाच वाढदिवस आहे. 'डिस्को किंग ऑफ इंडिया' म्हणून बप्पी लाहिरी ओळखले जात. बॉलिवूडच्या अनेक गाजलेल्या सिनेमांतील गाणी बप्पी लाहिरींनी गायली आहेत.


बप्पी लाहिरी यांनी 1973 साली 'नन्हा शिकारी' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण 1982 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या मिथुन चक्रवर्तीच्या 'डिस्को डान्सर' या सिनेमामुळे बप्पी लाहिरी प्रकाशझोतात आले. अनेक सिनेमांसाठी त्यांनी गायक आणि संगीतकार म्हणून काम केलं आहे.


बप्पी लाहिरी यांचे खरे नाव आलोकेश लहरी असे होते. त्यांनी संगीतक्षेत्रात अनेक वेगवेगळे प्रयोग केले. बॉलिवूडला  रॉक आणि डिस्को संगीताची ओळख करुन दिली. बप्पी लाहिरी यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक हिट गाणी दिली आहेत. 'चलते चलते', 'डिस्को डान्सर' आणि 'शराबी' या सिनेमांतील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी लोकप्रिय ठरली. 


बप्पी लाहिरी यांची गाजलेली गाणी


'यार बिना चैन कहा रे', 'याद आ रहा है तेरा प्यार', 'रात बाकी, बात बाकी', 'तम्मा तम्मा लोगे', 'बम्बई से आया मेरा दोस्त', 'ऊलाला ऊलाला', 'तुने मारी एंट्रिया' ही बप्पी लाहिरी यांची गाजलेली बॉलिवूडची गाणी आहेत. 'शराबी' या सिनेमासाठी बप्पी लाहिरी यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांना फिल्मफेअरतर्फे जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.


बप्पी लाहिरींना घरातच मिळालेला संगीताचा वारसा


बप्पी लाहिरी बप्पीदा म्हणूनदेखील ओळखले जात. त्यांना दागिण्यांची प्रचंड आवड होती. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी संगीतक्षेत्रात काम करायला सुरुवात केली. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 साली पश्चिम बंगालमधील जलपायगुडीमध्ये झाला होता. त्यांचे आई-वडील दोघेही बंगाली गायक आणि संगीतकार होते.


राजकारणात प्रवेश 


बप्पी लाहिरी यांनी 2014 साली राजकारणात प्रवेश केला होता. त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी हुगळी जिल्ह्याच्या श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला होता.


बप्पी लाहिरींनी केला होता वर्ल्ड रेकॉर्ड


बप्पी लाहिरी यांनी 1986 साली 33 सिनेमांतील 180 गाणी कॉर्ड केली होती. त्यांच्या या कामगिरीची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड' रेकॉर्डमध्ये झाली आहे. संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरी यांनी सुमारे साडेसहाशे चित्रपटांना संगीत दिले आहे. हिंदी, बंगाली व्यतिरिक्त त्यांनी जवळपास सर्व भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तसेच, 5000 हून अधिक गाणी रचली आहेत. 


संबंधित बातम्या


Mika Singh : मिका सिंहकडून बप्पीदांना सांगीतिक श्रद्धांजली, गाण्यांमधून दिला ‘गोल्डन सिंगर’च्या आठवणींना उजाळा!