Vikram Gokhale passes away : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने रंगभूमी, चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सर्वस्तरांतून विक्रम गोखले यांना आदरांजली अर्पण केली जात आहे.
भारतीय रंगभूमी व चित्रपटक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान- मुख्यमंत्री
आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मराठी व हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख झाले.त्यांचा जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपटक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
विक्रम गोखलेंच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले: देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले असल्याची शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमा जगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. एक चतुरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक, नाट्य कलावंतच नाही, तर व्यक्ती म्हणून सुद्धा मोठ्या मनाचे, व्यापक सामाजिक भान असलेले हे व्यक्तिमत्त्व होते. भारदस्त अभिनेता, देहबोली आणि डोळ्यातून भाव व्यक्त करण्याचे त्यांचे कसब आणि आत्मविश्वासी बाणा हे क्वचितच कुणाला लाभले. अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा परिचय तर मोठा होताच, पण सैन्यदलात काम करताना अपंगत्त्व आलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत किंवा निराधार बालकांचे शिक्षण यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ आपल्यातून हरपले आहे. प्रत्येक भूमिकेला सुयोग्य न्याय देणार्या, ती व्यक्तिरेखा जीवंत साकारणार्या विक्रम गोखले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या लाखो चाहत्यांना लाभो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
"विक्रम गोखले यांनी अभिनयाचे मापदंड निर्माण केले" : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. रंगभूमी तसेच चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी अभिनय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. एकापेक्षा एक सरस भूमिकांमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाचे मापदंड प्रस्थापित केले. हिंदी व मराठी चित्रपट तसेच रंगभूमीवर प्रदीर्घ काळ काम करताना त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. काही चित्रपट व नाटके केवळ त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे लोकांच्या लक्षात आहेत. सामाजिक प्रश्नांवर देखील गोखले यांनी आपली मते निर्भीडपणे मांडली. अलीकडेच दिनांक १५ ऑगस्ट रोजी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली, परंतु दुर्दैवाने ती भेट शेवटची ठरली. या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून विक्रम गोखलेंना आदरांजली
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, विक्रम गोखले गेले यावक विश्वास बसत नाही. काल परवापर्यंत ते संपर्कात होते. अनेक विषयांवर त्यांची मते ठाम असत. एक कसदार राजबिंडा अभिनेते म्हणून चित्रपट रंगभूमी त्यांनी गाजवली. स्पष्ट संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य. हिंदी सिनेसृष्टीतील तो लोकप्रिय मराठी चेहरा होता. त्यांचे जाणे चटका लावणारे आहे. मृत्यूवर मात करुन ते परत येतील असे वाटत होते. पण, दुर्दैव. या महान अभिनेत्याला आदरांजली अर्पण करतो.
विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपला - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. मराठी रंगभूमी , मराठी व हिंदी चित्रपट , मालिका अशा तिन्ही माध्यमात त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर आपले कर्तृत्व सिद्ध केले. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या विक्रम गोखले यांनी अभिनयासोबत लेखन व दिग्दर्शन देखील केले आहे. अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ज्या ज्येष्ठ अभिनेत्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर मराठी रंगभूमी समृद्ध केली त्यात विक्रम गोखले यांचे नाव अग्रणी स्थानावर घेतले जाते. या कलातपस्वी व्यक्तिमत्वाने मराठी रंगभूमी सह मराठी व हिंदी चित्रसृष्टीसह मलिका क्षेत्र देखील गाजवले . त्यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
कलेच्या प्रांतातील एक सर्जनशील कलावंत आणि मार्गदर्शक आपल्यातून निघून गेला : चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने कलेच्या प्रांतातील एक सर्जनशील कलावंत आणि मार्गदर्शक आपल्यातून निघून गेला आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी मराठी, हिंदी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत अत्यंत आदराचे स्थान मिळविले. त्यांच्याबद्दल साऱ्यांनाच वाटत असलेली आदरयुक्त भीती हा मराठी माणसाच्या अभिमानाचा विषय होता. चित्रपट सृष्टीसारख्या मायावी जगाच्या पलीकडेही एक जग आहे आणि त्या जगातील सामान्य माणसांच्या वेदनेशी, जगण्याशी आपण एकरूप व्हायला हवे, हे मूल्य त्यांनी आयुष्यभर जोपासले. या श्रेष्ठ कलावंत, विचारवंताच्या नसण्याची ही उणीव नेहमी जाणवत राहणार आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
Dilip Prabhavalkar : ज्याची भिती होती तेच झालं. त्यांच्या आजाराबद्दल मला अनेक दिवस माहित होतं. पण त्यातून ते बरे होतील असं वाटलं होतं. सख्खा आणि सच्चा सहकलाकार होता. त्यांना अभिनयाचा वारसाच मिळाला होता. ही त्यांची चौथी पिढी होती. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की आम्हाला लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय यांचा एक सिमीत करणारा त्रिवेणी संगम 'बॅरिस्टर' या नाटकामध्ये बघता आला.