मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यपला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं समोर आलं आहे. ताहिराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत ही धक्कादायक माहिती सर्वांना सांगितली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ताहिराला कॅन्सर असल्याचं वेळेत समजलं.
ताहिराने दिलेल्या माहितीनुसार, "ब्रेस्ट कॅन्सर झिरो स्टेजवर असतानाच तिला या गंभीर आजाराची माहिती मिळाली. ताहिराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहिलं की, काही दिवसांपूर्वी माझ्या उजव्या स्तनामध्ये डीसीआयएस झाल्याचं निदान झालं आहे. हा कॅन्सर झिरो स्टेजवर आहे. सुरुवातीलाच कॅन्सरचं निदान झाल्यानं विशिष्ट भागापुरता हा मर्यादित आहे."
महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी मी ही पोस्ट लिहिली असल्याचं ताहिरानं म्हटलं आहे. कॅन्सरवर सध्या उपचार घेत असून आपली प्रकृती ठिक असल्याचंही तिने सांगितलं आहे.
अभिनेता आयुषमान खुराणानेही आपल्या पत्नीच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट केली आहे. 'माझी वॉरिअर प्रिन्सेस', असं आयुषमानने म्हटलं आहे.
सोनाली बेंद्रे आणि इरफान खान या बॉलिवूडमधील गुणी कलाकारांना कॅन्सर या गंभीर आजारानं ग्रासलं आहे. इरफान खान लंडनमध्ये आपल्या कॅन्सरवर उपचार घेत आहे. तर सोनाली बेंद्रे अमेरिकेत आपल्या आजारावर उपचार घेत आहे. दोघेही आपल्या प्रकृतीविषयीची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतात.