गेल्यावर्षी भारताकडून राजकुमार रावच्या न्यूटन सिनेमाला ऑस्करसाठी पाठवण्यात आलं होतं. पण या सिनेमाची निवड अंतिम पाचमध्ये होऊ शकली नाही.
रिमा दास दिग्दर्शित ‘विलेज रॉकस्टार’ सिनेमा ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार असल्याची घोषणा फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र सिंह बाबू यांनी केली. भारताकडून ऑस्कर अधिकृत प्रवेशिकेसाठी हिंदी सिनेमातून राजी, मंटो, हिचकी, पद्मावत, ऑक्टोबर, पिहू, हल्का, 102 नॉट आऊट, पॅडमॅन, अज्जी, तुम्बाद, बायोस्कोपवाला हे सिनेमे शर्यतीत होते.
याशिवाय मराठीतून न्यूड आणि गुलाब जाम, तेलुगूतून महंती, गुजरातीमध्ये रेवा आणि तामिळ, मल्याळम, कन्नडसह अनेक भाषांमधील 28 सिनेमे ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत होते, ज्यापैकी ‘विलेज रॉकस्टार’ची निवड करण्यात आली.
भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात येणाऱ्या सिनेमांपैकी आतापर्यंत तीनच सिनेमांची अंतिम पाचमध्ये निवड झाली आहे. मेहबूब खान दिग्दर्शित मदर इंडिया (1957), सलाम बॉम्बे (1988) आणि आशुतोष गोवारीकर यांचा लगान (2001) या सिनेमांचा यामध्ये समावेश आहे. या तीन सिनेमांचा परदेशी भाषा श्रेणीतून जगभरातून येणाऱ्या सिनेमांपैकी पाच अंतिम सिनेमांच्या सूचीमध्ये समावेश झाला होता. आतापर्यंत एकाही भारतीय सिनेमाचा ऑस्कर पुरस्काराने गौरव करण्यात आलेला नाही.