"‘अतुल्य भारत’ अभियानाचे ब्रँड अॅम्बेसेडर करण्याला स्थगिती देण्यात आल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र या पदासाठी मला सरकारकडून अधिकृतरित्या विचारणाच झाली नव्हती. त्यामुळे मला ‘अतुल्य भारत’ अभियानाचे ब्रँड अॅम्बेसेडर न करण्याचा प्रश्नच येत नाही. याबाबतच्या सर्व बातम्या बिनबुडाच्या आहेत", असं अमिताभ यांनी म्हटलं आहे.
याशिवाय "पनामा पेपर्सबाबत मला अजूनही प्रश्न विचारण्यात येत आहेत. मात्र मी कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगू इच्छितो की, त्याप्रकरणात माझं नाव चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आलं आहे", असंही अमिताभ यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, अतुल्य भारतचा माजी ब्रँड अॅम्बेसेडर आमीर खानसोबतचा करार संपल्यानंतर अमिताभ बच्चन आणि प्रियंका चोप्रा यांच्या खांद्यावर ही धुरा देण्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र पनामा प्रकरणानंतर बच्चन यांच्या नावाला स्थगिती देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र आता याप्रकरणाबाबत खुद्द बिग बींनी स्पष्टीकरण दिलं आहे.
पनामा पेपर्समध्ये भारतातील कोण कोण आहे?
भारतात बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, डीएलएफचे केपी सिंह, इक्बाल मिर्ची आणि उद्योगपती अडाणी यांच्या ज्येष्ठ बंधूचा पनामा पेपर्समध्ये समावेश असल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं होतं.
इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटीव जर्नालिस्ट्स (ICIJ) आणि ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) या दोन प्रकल्पातील पत्रकारांनी घेतलेल्या शोधमोहीमेतून हा गौप्यस्फोट झाला. जागतिक शोध पत्रकार समूहात तब्बल 78 देशातील 107 पत्रकार संघटनांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील इंडियन एक्स्प्रेस असल्याचं सांगितलं जातं.
इंडियन एक्स्प्रेसने प्रकाशित केलेल्या बातमीत बच्चन कुटुंबीय, अडाणी आणि केपी सिंह यांच्यासह अन्य 500 भारतीय नावांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या दाव्यानुसार, पश्चिम बंगालमधील राजकारणी शिशीर बाजोरिया लोकसत्ता या पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अनुराग केजरीवाल यांचाही समावेश आहे.
पनामा पेपर्स काय आहे?
पनामा येथील एका लॉ फर्मचे काही गोपनीय कागदपत्रे लीक करण्यात आली. त्यामुळे जगभरातील अतिश्रीमंत, बडे राजकारणी, देशांचे प्रमुख त्यांच्याकडील ब्लॅकमनी कसा सुरक्षित ठेवतात किंवा विदेशात पाठवतात याचा उल्लेख आहे. जगभरात व्हिसल ब्लोअर म्हणून चर्चेत आलेल्या एडवर्ड स्नोडेन यानेही हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट असल्याचा दावा केला. हा गौप्यस्फोट करण्यात एडवर्ड स्नोडेनचा मात्र काही सहभाग नाही.
11 दशलक्ष म्हणजे तब्बल एक कोटी दहा लाख पानांचा गोपनीय दस्तावेज या शोध पत्रकारांच्या हाती लागलेत. गेले वर्षभर जगभरातील अनेक शोध पत्रकार या मोहीमेवर काम करत होते. परदेशी पैसे पाठवणं हे बेकायदेशीर नाही, मात्र काही देशांचे प्रमुखच जेव्हा त्यांच्याकडील अतिरिक्त पैसा असा विदेशात छुप्या मार्गाने पाठवतात, तेव्हा नक्कीच संशयास्पद आणि आक्षेपार्ह असतं.
यामध्ये 128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे आहेत.