Assam Flood : आसाममध्ये (Assam) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. देशाच्या ईशान्येकडील राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे तसेच अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. माहितीनुसार, 21 लाखांहून अधिक लोक पुरामुळे बाधित झाले आहेत. त्याचवेळी, आसाममधील एक पोलीस स्टेशन (Bhangnamari Police Station) पुरामुळे पत्त्यांप्रमाणे कोसळताना दिसले आहेत.


पुराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर


आसाममध्ये आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान होत आहे. आसाममधील बहुतांश जिल्ह्यांतील पुराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दिसतील. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक पोलीस स्टेशन नदीत बुडताना दिसत आहे. पुराच्या पाण्याने व्यापलेले हे पोलीस ठाणे नलबारी जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. नदीच्या जोरदार प्रवाहामुळे भांगनामारी पोलीस ठाणे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.


 






पोलीस ठाणे नदीत बुडाले


मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुत्रा नदीला पूर असल्याने नलबारी जिल्ह्यातील दुमजली पोलीस ठाण्याच्या इमारतीचा मोठा भाग पुरात बुडाला आहे. त्याचा व्हिडिओ गावकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुराचे पाण्यामुळे ही इमारत रिकामी करण्यात आली. त्यामुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिलासा देणारी बातमी दिली आहे की, ब्रह्मपुत्रा नदीजवळील भागात पुराचे पाणी ओसरू लागले आहे.


आसाममध्ये पुरामुळे वाईट परिस्थिती


त्याचवेळी, आसाममधील कछार आणि त्याच्या शेजारील करीमगंज आणि हैलाकांडी जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. आसाममधील 28 जिल्ह्यांमध्ये 21 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. कचार जिल्ह्यातील सिलचर शहरासारखे अनेक भाग अजूनही पाण्याखाली आहेत. त्याचवेळी आसाममध्ये या वर्षी एप्रिलपासून पूर आणि भूस्खलनात 139 जणांचा मृत्यू झाला आहे.