Ashok Saraf : महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार येत्या 22 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तर मानाचा "गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार" ज्येष्ठ पार्श्र्वगायक श्री. सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.


वरळी येथील डोम, एनएससीआय ( नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजता होणाऱ्या 57 व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात करण्यात येतील. या समारंभास केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री. पीयूष गोयल, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 


57 व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार वितरण


ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. राजकपूर जीवनगौरव पुरस्कार सन 2020 साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अरुण इराणी, सन 2021 साठी ज्येष्ठ अभिनेते श्री. मिथुन चक्रवर्ती आणि सन 2022 साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेलन यांना जाहीर झाला आहे तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सन 2020 साठी ज्येष्ठ दिग्दर्शक श्री. जे. पी. दत्ता, सन 2021 साठी ख्यातनाम गायक श्री. सोनू निगम आणि सन 2022 साठी श्री. विधू विनोद चोप्रा यांना जाहीर झाला आहे. या समारंभात त्यांना सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जातील.


ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार सन 2020 साठी ख्यातनाम चित्रपट अभिनेते स्व. श्री. रविंद्र महाजनी (मरणोत्तर), सन 2021 साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा चव्हाण आणि सन 2022 साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा नाईक यांना जाहीर झाला आहे. यासोबतच चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार सन 2020 साठी चित्रपट दिग्दर्शक श्री. गजेंद्र अहिरे, सन 2021 साठी ज्येष्ठ पार्श्वगायक श्री. रवींद्र साठे  आणि सन 2022 साठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक श्री. नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे.


राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे आणि सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी केले आहे.


चित्रपटसृष्टीसाठी कार्यरत सांस्कृतिक कार्य मंत्री


राज्य शासनाने नेहमीच मराठी चित्रपट आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित कलावंत, तंत्रज्ञ यांच्या अडचणी सोडविण्याची आणि त्यांच्या मागे ठामपणे उभे राहून या क्षेत्राला मदतीची भूमिका घेतली आहे. चित्रपटांसाठीचे रखडलेले अनुदान हा महत्वाचा विषय तातडीने मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मार्गी लावला.


चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या विविध परवानगी वेळेत मिळण्यासाठी एक खिडकी पद्धत सुरु करण्याचा निर्णय घेतला. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याशी वेळोवेळी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याशिवाय, या क्षेत्रातील विविध कला घटकांसाठी देण्यात येणारे पुरस्कार वेळेत देण्यासंदर्भातील वेळापत्रक तयार केले आहे. त्या अनुशंगाने गेल्या दोन वर्षातील पुरस्कारही यावर्षी देण्यात येणार असून यापुढील काळात प्रत्येक पुरस्कार हा वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या दिनांकाला प्रदान करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी ठरवले आहे. 


संबंधित बातम्या


Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर