Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Puraskar-2023) जाहीर करण्यात आला आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच अशोक सरफा यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तसेच चित्रपटसृष्टीत त्यांनी विशेष ओळख देखील निर्माण केली. आता अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.


मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा


अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. 


अशोक सराफ यांनी  केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून  घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे.


अशोक मामांनी प्रेक्षकांची मनं जिंकली


आपल्या बहारदार अभिनयाने चित्रपटांचा पडदा, नाटकांचं व्यासपीठ, टीव्हीची स्क्रीन आणि बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेला सुवर्णझळाळी बहाल करणाऱ्या अशोक सराफ यांना यंदाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कधी विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर खुदकन् हसू, कधी आशयघन अभिनयाने डोळ्यांत टचकन् पाणी आणणारे,तर कधी कसदार अभिनयाने प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे अशी अशोक सराफ यांचं वर्णन केलं जातं. अशोक सराफ यांनी माध्यमांचे जवळपास सर्वच प्लॅटफॉर्म भारावून टाकले.


मराठी म्हणू नका, हिंदी म्हणून नका. अगदी भोजपुरी सिनेमांनाही अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने अक्षरश: सजवलं. कधी नायक, कधी सहनायक तर कधी खलनायक अशा भूमिकांची तोरणं त्यांनी मनोरंजन विश्वावर बांधली. महत्त्वाचं म्हणजे, फक्त अभिनयच नाही तर, त्यांनी अनेक सिनेमांमध्ये गाणीही गाऊन, प्रेक्षकांना सूरमयी अनुभव दिला. अशा या चौफेर मुशाफिरी करणाऱ्या, महान अभिनेत्याचा महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आलाय.


अशोक सराफ यांचे चित्रपट


अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच,आत्मविश्वास,नवरी मिळे नवऱ्याला,गंमत जंमत या चित्रपटांमधील अशोक सराफ यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  करण अर्जुन, सिंघम यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील अशोक सराफ यांनी काम केलं.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


"माझी आतापर्यंतची धडपड सार्थकी लागली"; महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांनी एबीपी माझाला दिली प्रतिक्रिया