Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Puraskar) जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार झाल्यानंतर एबीपी माझाला अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


काय म्हणाले अशोक मामा?


अशोक मामा म्हणाले, "मला थोड्या वेळापूर्वी कळालं की, मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मला हा पुरस्कार मिळेल याची मला कल्पना नव्हती. मी चांगलं काम करतो, तुम्हाला माझं काम आवडतंय, ही माझ्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे. माझी आतापर्यंतची धडपड सार्थकी लागली,असं मला वाटतंय. मी केलेलं काम प्रेक्षकांना आवडलं पाहिजे, हाच कायम माझा हेतू होता. प्रेक्षक आहेत तरच मी आहे. माझ्या प्रवासात ज्यांनी-ज्यांनी आतापर्यंत मला सहाय्य केलं, त्या प्रत्येकाचेच आभार मी मानतो. निवेदिताचे देखील मी आभार मानतो."


"ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते  अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा आज केली. अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले. त्यांचे मनापासून अभिनंदन." अशी पोस्ट नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.






अशोक सराफ यांनी चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अशोक सराफ हे त्यांच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. अशातच आता  अशोक सराफ  यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आता त्यांचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 


अशोक सराफ यांनी या चित्रपटांमध्ये केलं काम


 आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच,नवरी मिळे नवऱ्याला, अशी ही बनवाबनवी आणि गंमत जंमत या मराठी चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी काम केलं. तसेच त्यांनी हमीदाबाईची कोठी,डार्लिंग डार्लिंग आणि व्हॅक्यूम क्लीनर यांसारख्या नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. तसेच मराठीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीतही अशोक सराफ यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे.  'दामाद', 'कोयला', 'येस बॉस', 'करण अर्जुन' आणि 'जोडी नं 1' या हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर